लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या पाणीसंकटावर मात करण्यासाठी महानगरपालिकेने सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसच ही समस्या असणार म्हणून मेयो, मेडिकलने हे दिवस कसेतरी काढले. परंतु आता २२ ऑगस्टपर्यंत पाणी कपातीचा निर्णय घेतल्याने ही दोन्ही रुग्णालये अडचणीत आली आहेत. विशेष म्हणजे, याचा मोठा फटका रुग्णसेवेला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मनपाने सुरुवातीला पाणी कपातीचा निर्णय एक आठवड्यासाठी घेतला. याची मुदत सोमवार २२ जुलै रोजी संपली. परंतु पाण्याचे संकट कायम पाहता २२ ऑगस्टपर्यंत पाणी कपातीचा निर्णय घेतला. यामुळे आता आठवड्यातून चार दिवस पाणीपुरवठा होणार आहे. यादरम्यान पाण्याचे टँकरही बंद राहणार आहे. परिणामी, याचा सर्वाधिक फटका मेयो, मेडिकलसारख्या मोठ्या रुग्णालयांना बसणार आहे. मेयोला दरदिवशी साधारण १२ लाख लिटर तर मेडिकलला १४ लाख लिटर पाण्याची गरज भासते. परंतु या दोन्ही रुग्णालयांना चार-पाच लाख लिटरने पाणी कमीच मिळते. यामुळे बाराही महिने या रुग्णालयाला पाणी समस्येला तोंड द्यावे लागते. आता संपूर्ण महिनाभर पाणी कपातीचा निर्णय घेतल्याने दोन्ही रुग्णालयाचे प्रशासन अडचणीत आले आहे. पाण्यामुळे रुग्णसेवा अडचणीत येऊ नये म्हणून आदल्या दिवशी साठविलेले पाणी रुग्णालयाच्या उपयोगात आणण्याचा निर्णय दोन्ही रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे वसतिगृहांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात या दोन्ही रुग्णालयातील वसतिगृह तहानलेले होते. काटकसर करून त्यांनी हा आठवडा काढला. परंतु आता महिना काढावा लागणार, या विचाराने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.सूत्रानुसार, पाण्याचा बिकट समस्येवर तात्पुरती उपाययोजना म्हणून नियोजित शस्त्रक्रिया पाणीपुरवठ्याच्या दिवशी ठेवण्याबाबतही या दोन्ही रुग्णालयात विचार सुरू आहे. याशिवाय बोअरवेल, विहिरीचे जास्तीत जास्त पाणी वापरण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी पुढील एक महिना या दोन्ही रुग्णालयासाठी संकटाचे ठरणार असल्याचे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.मेयो अडचणीतमेयोला पाणीपुरवठा करण्याची वेळ निश्चित नाही. यामुळे पाणी साठवून कसे ठेवावे, ही मोठी अडचण रुग्णालय प्रशासनासमोर आहे. याबाबत संबंधित विभागाला पत्र देण्यात आले. परंतु अद्यापही उपाययोजना नसल्याने येथील रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.
पाणी कपातीचा मेयो, मेडिकलला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:38 AM
पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या पाणीसंकटावर मात करण्यासाठी महानगरपालिकेने सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसच ही समस्या असणार म्हणून मेयो, मेडिकलने हे दिवस कसेतरी काढले. परंतु आता २२ ऑगस्टपर्यंत पाणी कपातीचा निर्णय घेतल्याने ही दोन्ही रुग्णालये अडचणीत आली आहेत. विशेष म्हणजे, याचा मोठा फटका रुग्णसेवेला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठळक मुद्देवसतिगृह तहानलेले : रुग्णसेवाही प्रभावित होण्याची शक्यता