लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेच्या पाणी कपातीचा सर्वाधिक फटका मेडिकलला बसला आहे. मंगळवारी मेडिकलच्या ‘लाँड्री’ला पाणीपुरवठाच झाला नसल्याने कपडे धुण्याचे काम थांबले. परिणामी, बुधवारी होणाऱ्या किरकोळ व गंभीर स्वरूपातील ५० वर शस्त्रक्रिया ठप्प पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात येईल.पाण्याचा संकटावर मात करण्यासाठी मनपाने २२ ऑगस्टपर्यंत पाणी कपातीचा निर्णय घेतला. यामुळे आता आठवड्यातून चारच दिवस पाणीपुरवठा होणार आहे. या दरम्यान पाण्याचे टँकरही बंद राहणार आहे. पाण्याचा भीषण टंचाईला नागपूरकर तोंड देत असताना आता मेडिकलच्या रुग्णांनाही त्याला सामोरा जावे लागत आहे. अडीच हजार खाटा असलेल्या मेडिकलमध्ये दरदिवशी १४ लाख लिटर पाणी लागते. परंतु आता एक दिवसाआड हे पाणी मिळत असल्याने दुपारनंतर वॉर्डातील नळ कोरडे पडतात. रुग्णांच्या नातेवाईकांवर बाहेरून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. यातच मंगळवारी मेडिकलच्या धुलाई गृह विभागाला पाणीपुरवठाच झाला नाही. यामुळे रुग्णालयातील सर्व कपडे धुतले नाही. या संदर्भाचे एक पत्र संबंधित विभागाने शस्त्रक्रिया करणाऱ्या प्रत्येक विभागाला दिले. यामुळे बुधवार २४ जुलै रोजी होणाऱ्या ५० वर गंभीर व किरकोळ स्वरुपातील शस्त्रक्रिया प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शस्त्रक्रियेसाठी कपडेच नाहीतमेडिकलचा शल्यचिकित्सा विभागात रोज २५ ते ३०, स्त्री व प्रसुती रोग विभागात १० ते १५, नेत्र रोग विभागात ३० ते ४०, प्लास्टिक सर्जरी विभागात २ ते ४ तर अस्थिव्यंगोपचार विभागात १० ते १५ गंभीर व किरकोळ स्वरुपातील शस्त्रक्रिया होतात. जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे कपडे स्वच्छ धुवून ‘ऑटोक्लेव्ह’ करूनच रुग्ण व डॉक्टरांना दिले जातात. रुग्णालयातील कपडे धुण्यासाठी मेडिकलचा स्वत:चा धुलाई गृह विभाग आहे. परंतु मंगळवारी या विभागाला पाणीपुरवठाच झाला नाही. यामुळे सोमवारी आलेले कपडे मंगळवारी धुतले नाही. शस्त्रक्रिया विभागाच्या ‘स्टॉक’मध्ये जे कपडे होते ते मंगळवारी वापरण्यात आले. मंगळवारी धुतलेले कपडे मिळालेच नसल्याने बुधवारी होणाऱ्या सर्वच शस्त्रक्रिया होणार नसल्याचे संकेत सूत्राने दिले आहे.
पाणी कपातीचा मेडिकलला फटका : कपडेच न धुतल्याने शस्त्रक्रिया ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:53 PM
महानगरपालिकेच्या पाणी कपातीचा सर्वाधिक फटका मेडिकलला बसला आहे. मंगळवारी मेडिकलच्या ‘लाँड्री’ला पाणीपुरवठाच झाला नसल्याने कपडे धुण्याचे काम थांबले. परिणामी, बुधवारी होणाऱ्या किरकोळ व गंभीर स्वरूपातील ५० वर शस्त्रक्रिया ठप्प पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात येईल.
ठळक मुद्दे५० वर शस्त्रक्रिया प्रभावित : रुग्णांचा जीव धोक्यात