लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शनिवारी पहाटेपासून विजेच्या कडकडाटासह वादळीवाऱ्यासह पावसाचा जोर वाढल्याने शहरातील काही भागात झाडाच्या फांद्या वीज यंत्रणेवर पडल्या. तर काही भागात वीज यंत्रणेत तांत्रिक दोष आला. त्यामुळे शहरातील बऱ्याच भागात वीज पुरवठा सुरू- बंद होत असल्याचे चित्र होते. महावितरणच्या बेसा परिसरातील सुतगिरणी उपकेंद्रामध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे बेसा केंद्रातील ३३ केव्हीचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे येथील अनेक भागातील हजारो ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला.
दरम्यान पावसाच्या तडाख्यात ११ केव्हीचा कमल चौक , नवा नकाशा, १२ केव्ही जिंजर मॉल, क्षेत्र-क्लार्क शहर, ११ केव्हीचा नारी एसआरए कॉलनी, समता नगरचा भाग येथील वीज यंत्रणेत दोष निर्माण झाले. त्यामुळे येथील वीज पुरवठा खंडित झाला. तर शहरातील पाणी शिरलेल्या खोलगट परिसरातही अनुचित प्रकार टाळण्यासाठी महावितरणला वीज पुरवठा खंडित करावा लागला. दरम्यान महावितरण कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच भर पावसात त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांच्या सह सर्व वरिष्ठ अधिकारी वीज व्यवस्थापन व दुरुस्तीच्या कामावर लक्ष ठेऊन होते. दरम्यान महावितरण कर्मचाऱ्यांकडून पाणी शिरलेल्या वीज यंत्रणेतून पाणी काढण्याचे प्रयत्नही सुरू केले. तर तांत्रिक दोष असलेल्या भागात काही मिनीटात दुरुस्तीकरून वीज सुरू झाल्याचा महावितरणचा दावा आहे. पण ग्राहकांनी तासन्तास पुरवठा खंडित राहिल्याचा आरोप केला. वाठोडा येथील ११ केव्ही, नरेंद्र नगर, ताजबाग, शताब्दी फीडर, श्रीकृष्ण नगर फिडरमध्ये बिघाड झाला आहे. रामटेके नगर येथील ११ केव्ही फिडर खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील हजारो ग्राहकांचा वीज पुरवठाही खंडित झाला.
वीज पेटी पाण्याखालीकिरणापूर गावातील एका घरघुती ग्राहकाच्या रोहित्राची वीज वितरण पेटी पोहरा नदीच्या पाणाखाली गेल्यामुळे १३० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने जवळपास ५ तास वीज पुरवठा बंद राहू शकतो.