उमरेड : नागपूर-उमरेड या चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. उमरेड तालुक्यातील चांपा हे गाव या महामार्गाला लागून आहे. महामार्गाच्या बांधकामासाठी वर्षभरापूर्वी चांपा येथील रस्त्यालगतची घरे, दुकाने तोडण्यात आली. नागरिकांनीही सहकार्य करीत या कामासाठी पुढाकार घेतला. असे असले तरी महामार्ग उंच आणि अनेकांचे घर, दुकाने मार्गाच्या खाली झाली. यामुळे पावसाचे पाणी थेट कुणाच्या घरात तर अनेकांच्या दुकानात शिरत आहे. त्यामुळे तातडीने महामार्गाच्या दुतर्फा नालीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. सदर महामार्गाची उंची घरापेक्षा तसेच दुकानापेक्षा चार ते पाच फूट झाली आहे. या कारणाने रस्त्यालगतच्या नागरिकांना येणे-जाणे कठीण झाले असून, रात्री-अपरात्री अनेकांची पंचाईत होत असते. महामार्गाच्या उंचीमुळे घरात पाणी शिरत असून, सभोवताल डबकेच दिसून येते. पावसाचे पाणी निघण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन आखण्यात आले नाही. गावकऱ्यांनी या समस्येचे निवेदन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संबंधित विभागास सोपविले आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूने नालीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन सोपविल्यानंतरसुद्धा संबंधित विभागाने ही बाब गंभीरतेने घेतली नाही. संबंधित कंत्राट कंपनीला वारंवार सांगूनही कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून सीमांकनानुसार काम करण्यात आले नाही, असाही आरोप गावकऱ्यांचा आहे. तातडीने या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कमलेश तिवारी, सुनील साहु, अरुण कावळे, प्रदीप तिवारी, प्रशांत शेंदरे, सफल मून, आलोक तिवारी, प्रमोद गुप्ता आदींनी केली आहे. या समस्येकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षासुद्धा गावकऱ्यांची आहे.
सर्व्हिस रोड पाहिजे
चांपा हे गाव उमरेड-नागपूर महामार्गावरील मध्यवर्ती गाव असून, रोडलगत दवाखाना, ग्रामपंचायत, शाळा आहे, शिवाय लगतच आठवडी बाजारसुद्धा भरतो. बसथांबा, हॉटेल, दुकाने तसेच लोकवस्तीसुद्धा अगदी लागूनच असल्यामुळे याठिकाणी रात्रंदिवस वर्दळ सुरू असते. वाहनांच्या पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असून, सर्व्हिस रोडची मागणीही नागरिकांनी केली आहे.