लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याच्या भीषण टंचाईमुळे मनपाने शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारी शहरात नळ सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे चांगलाच हाहाकार उडाला. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागली. आज गुरुवारी नळ सोडल्यामुळे काहिसा दिलासा मिळाला.बुधवारी शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे मोल खऱ्या अर्थाने कळले. नळ न आल्याने दिवसभर पाणी कसेबसे वापरण्यात आले. परंतु सायंकाळपर्यंत अनेकांच्या घरचे पाणी संपले होते. शेजारी पाणी मागितले असता त्याच्याकडेही पाणी कुठून येणार. प्रत्येकाची सारखीच अवस्था होती. पिण्यासाठीही पाणी शिल्लक नव्हते. अशा वेळी नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे कॅन बोलावून रात्र काढावी लागली. बुधवारचा फटका लक्षात असल्याने गुरुवारी अनेकजण खास पाण्यासाठी सकाळीच उठले. दुसऱ्या दिवशी नळ येणार नाहीत याची जाणीव असल्याने पाणी साठवून ठेवण्यासाठी नागरिकांनी घरातील राखून ठेवलेली भांडीही बाहेर काढली. ड्रम आदी वस्तू बाहेर काढल्या. परंतु अनेक ठिकाणी केवळ तासभर नळ सोडल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.पिण्याच्या पाण्याचा त्रास केवळ नागरिकांनाच होत नाही तर रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका बसला आहे. रेल्वेत पाणी भरणे बंद करण्यात आले आहे. नागरिकांना होत असलेला हा त्रास पाहता राजकीय पक्षही रस्त्यावर उतरले आहेत. गुरुवारी दुपारी मनपाच्या विरोधात मटका फोडो आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री अनिस अहमद यांनी शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.एकूणच शहरात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून लवकरच मुसळधार पाऊस न आल्यास संतप्त नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाण्यासाठी हाहाकार :अनेक ठिकाणी केवळ तासभरच नळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:57 AM
पाण्याच्या भीषण टंचाईमुळे मनपाने शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारी शहरात नळ सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे चांगलाच हाहाकार उडाला. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागली. आज गुरुवारी नळ सोडल्यामुळे काहिसा दिलासा मिळाला.
ठळक मुद्देराजकीय पक्षही उतरले रस्त्यावर