नागपूर : एरवी विधानभवन परिसरात सत्ताधारी व विरोधकांमधील होणारी राजकीय चकमक नवीन नाही. या भवनाने अनेकदा असे दावे-प्रतिदावे अनुभवले आहेत व राजकारणाचे विविध रंगदेखील पाहिले आहेत. मात्र शुक्रवारी चक्क दारुच्या बाटल्यांवरुन राजकारण तापल्याचे दिसून आले.
शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे विधानभवनातील सर्व ‘रेनप्रुफ’ व्यवस्था उघडी पडली. परिसरातील पाण्याचा निचरा व्हावा म्हणून ज्यावेळी गटरचे झाकण उघडण्यात आले तेव्हा त्यात दारुच्या बाटल्या आढळून आल्या. दुर्दैवाची बाब म्हणजे या बाटल्या नेमक्या कुणाच्या कार्यकाळातील आहे, यावरुन सत्तापक्ष व विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाल्याचे दिसून आले.
शुक्रवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने विधानभवन परिसराला तळ्याचे स्वरुप आले होते. गटारे तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला. मागच्या बाजूला असलेल्या एका गटाराजवळ मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. त्यामुळे तेथील झाकणे काढण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली. कर्मचाऱ्यांनी ज्यावेळी ही झाकणे काढली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गटराच्या आत दारुच्या व बिअरच्या बाटल्या होत्या. तत्काळ कर्मचाऱ्यांनी तेथील सर्व कचरा साफ केला व पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केली. मात्र तोपर्यंत प्रशासनाची पोलखोल झाली होती.
विधानसभा अध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी
विधानभवन परिसरात बाटल्या आढळल्यामुळे विधानसभा अध्यक्ष नाराज झाले होते. संबंधित बाटल्या लवकर काढा व लगेच परिसराबाहेर फेका, असे निर्देश त्यांनी दिले.
दावे-प्रतिदावे रंगले
दरम्यान, संबंधित बॉटल नेमक्या कुणाच्या कार्यकाळातील आहेत, यावरुन आमदारांकडून दावे-प्रतिदावे झाले. भाजपचे आमदार सुधाकर कोहळे यांनी संबंधित बॉटल या २०१३ च्या असल्याचे सांगत आमच्या कार्यकाळातील त्या नसल्याचे अजब विधान केले. तर शिवसेनेचे आ.अनिल परब यांनी गटारी तुंबल्या तरी कशामुळे याची चौकशी करावी, असे म्हणत बॉटल आल्या कशा याकडे संकेत केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी विधानभवनात दारुच्या बाटल्या येतात आणि सत्ताधाऱ्यांना याची माहितीही कळत नाही, हे दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन केले.
बाटल्या आल्या तरी कशा?
विधानभवन परिसर हा अत्यंत संवेदनशील व सुरक्षित मानला जातो. येथे प्रत्येकाची तपासणी झाल्यावरच आत येता येते. शिवाय अधिवेशन सुरू होण्याअगोदर कोपऱ्याकोपऱ्याची तपासणी होते. असे असताना येथे बाटल्या नेमक्या आल्या कशा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आ.बच्चू कडू यांनी यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी केली.