लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंचच्या (२३०० एमएम) जलवाहिनीवर चार ठिकाणी असलेली गळती दुरुस्ती करण्यात येणार आहे. दुरुस्तीसाठी सुमारे महिनाभराचा कालावधी लागेल. त्यामुळे नागपूर शहराला ६ जानेवारीपासून महिनाभर दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.
महापालिकेच्या १० झोनपैकी लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ झोन, हनुमाननगर झोन, धंतोली झोन, गांधी झोन, आसीनगर झोन, मंगळवारी झोन पूर्णत: तर सतरंजीपुरा झोनच्या काही भागाला म्हणजे शहराच्या सुमारे ६५ टक्के भागाला याचा फटका बसेल. जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी सांगितले की, पेंचची मुख्य जलवाहिनी २७ किलोमीटर लांबीची आहे. यात जलवाहिनीत इरगाव, कारंगाव येथे चार ठिकाणी मोठी गळती आहे. पाणीगळतीमुळे ४ ते ५ एमएलडी पाणी हे वाहून जात आहे. पाणीगळती थांबविण्यात आली नाही तर उन्हाळ्यात याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी, या कामाकरिता पेंच १,२,३,४ येथून शहराला होणारा पाणीपुरवठा महिन्याभरासाठी एक दिवसाआड करण्यात येईल. ओसीडब्ल्यू कंपनीकडे या कामाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे. कंपनीने प्राथमिक स्वरुपात कामाची सुरुवात केली आहे.
गोरेवाडा जलशुद्धीकरणातून पाणीपुरवठा
- पेंचच्या जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीकरिता येथील जलवाहिनीतून पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. एक दिवसाआड होणारा पाणीपुवठा हा गोरेवाडा जलशुद्धीकरण केद्रातून करण्यात येणार आहे. या केंद्रातून शहराला ४०० ते ४५० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येईल.