नागपूर : पुलावरच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे दक्षिणेकडील रेल्वे सेवा रेंगाळली. तब्बल ३३ रेल्वेगाड्या आणि लाखो प्रवासी त्यामुळे प्रभावित झाले.
बुधवारी रात्रीपासून सर्वत्र जोरदार पावसाला सुरूवात झाल्याने नदी-नाले ओसंडून वाहू लागले. जागोजागच्या पुलावरून धोक्याची पातळी ओलांडत पाणी वाहत असल्यामुळे रस्ते वाहतूकीलाच नव्हे तर रेल्वे वाहतुकीलाही जबर फटका बसला. परिणामी लाखो प्रवाशांना मोठा त्रास सहन करत प्रवास करावा लागला. दक्षिण मध्य रेल्वेच्या (एससीआर) बल्लारशाह-काझीपेट विभागातील हसनपार्ती रोड-काझीपेट सेक्शनमधील पुल क्रमांक ३ वरून धोक्याच्या पातळीवर पाणी वाहत असल्याने एससीआरच्या बल्लारशाह ते काझीपेट विभागादरम्यान अप आणि डाऊन रेल्वे गाड्यांची वाहतूक आज गुरुवारी सकाळपासून काही वेळेसाठी स्थगित करण्यात आली. तर २३ गाड्या वेगवेगळ्या मार्गाने वळविण्यात आल्या. या प्रकारामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमंडले. अनेक गाड्या विलंबाने धावू लागल्या.
निजामुद्दीन एक्सप्रेस रद्दपावसाचा जोर, गाडीची वेळ आणि लोहमार्गावरची स्थिती लक्षात घेऊन आज गाडी क्रमांक ००७६२ निजामुद्दीन एक्सप्रेस रद्द करण्यात आली. सकाळीच अधिकाऱ्यांनी त्या संबंधीचा निर्णय प्रवाशांना सोशल मिडियाच्या माध्यमातून कळविला.
कर्नाटक संपर्क क्रांती आणि गोरखपूर सुपर फास्ट रेंगाळलीगाडी क्रमांक १२६४९ कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस तसेच गाडी क्रमांक २२५३४ गोरखपूर सुपर फास्ट एक्सप्रेस निजामाबाद - नांदेड- अकोला- खंडवा- इटारसी मार्गे वळविण्यात आली होती.१२२८५ हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस सिकंदराबादहून मार्गे-वाडी-दौंड-मनमाड-इटारसी मार्गे वळविण्यात आली होती. अशाच प्रकारे ००७२१ रेनिगुंटा निजामाबाद एक्सप्रेस, २२६४७ कोरबा त्रिवेंद्रम सेंट्रल एक्सप्रेस, १२७२४ तेलंगणा एक्सप्रेस, २२६९२ बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस, २०८०६ आंध्रप्रदेश एक्सप्रेस आणि अन्य १५ अशा एकूण २३ रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले होते.
दुपारनंतर पुन्हा त्रेधातिरपटदुपार झाली तरी दक्षिणेकडील रेल्वे मार्गावरचे पाणी उतरत नसल्याने दुपारनंतर पुन्हा खालील १० गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले. त्यात १२६५५ नवजीवन सुपर फास्ट एक्सप्रेस, अंदमान एक्सप्रेस, १२६२६ केरला एक्सप्रेस, १२६२२ तामिलनाडू एक्सप्रेस, १२९७६ म्हैसूर सुपर फास्ट एक्सप्रेस, २०४८१ हमसफर एक्सप्रेस, १२६१६ जीटी एक्सप्रेस, २०८२० ओखा पुरी एक्सप्रेस, ०३२४५ एसएमव्हीटी, केसीआर बेंगळुरू, १२२९६ संघमित्रा एक्सप्रेस, १२७२२ दक्षिण एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश होता.