लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे कोरोनामुळे मनुष्यावर संकट ओढवले असताना मुक्या जीवानाही हाल सोसावे लागत आहे. अर्धा एप्रिल महिना लोटला तसा सूर्याचा ताप वाढायला लागला आहे. अशावेळी भटकी जनावरे व मुक्या श्वानांची तहान भागविण्यासाठी सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या वतीने शहरात ठिकठिकाणी जलपात्र ठेवण्यात आले आहेत.एप्रिल, मेच्या गरमीत माणसाचा त्रास वाढतो तसे प्राण्यांनाही प्रचंड हाल सहन करावे लागतात. किंबहुना मुक्या प्राण्यांना अधिकच त्रास होतो. त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी इकडेतिकडे भटकंती करावी लागते. पाण्याविना प्राण्यांचा जीवही जातो. प्राण्यांचे हे हाल लक्षात घेता सेव्ह स्पीचलेसच्या स्मिता मिरे यांच्या पुढाकाराने शहरात ठिकठिकाणी मुक्या जनावरांसाठी ६४ जलपात्र ठेवण्यात आले. सेव्ह स्पीचलेसच्या कार्यकर्त्यांनी स्वत: खर्च करून हे जलपात्र खरेदी केले आणि निर्धारित ठिकाणी ठेवले. छत्रपती चौक, ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक, विद्यापीठाची नवीन इमारत, अंबाझरी गार्डन, आयटी पार्क, लक्ष्मीनगर चौक, दीक्षा•ाूमी चौक, शंकरनगर, महाराज बाग, व्हेटरनरी कॉलेज, सीताबर्डी पोलीस स्टेशन, सदर, गिट्टीखदान पोलीस स्टेशन, काटोल नाका, अमरावती रोड, समर्थनगर, शिवाजीनगर, गांधीनगर अशा ६४ ठिकाणी हे जलपात्र ठेवले आहेत. संस्थेतर्फे पुन्हा १०० ठिकाणी जलपात्र ठेवण्यात येणार असल्याचे स्मिता मिरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. संस्थेच्या सदस्यांनी स्वत: परिश्रम घेत हे जलपात्र जागोजागी ठेवले, शिवाय यामध्ये पाणीसुद्धा भरून ठेवले आहे. या सिमेंटच्या जलपात्रामध्ये नियमित पाणी भरून ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्मिता यांनी सांगितले. ज्या लोकांना मुक्या जीवांसाठी जलपात्र घ्यायचे आहेत त्यांनी स्वत: त्यासाठी पुढाकार घेण्याचे किंवा संस्थेला मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.