कामठी : सहलीसाठी आलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा कामठीतील महादेव घाट कन्हान नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. अभिजित कमलेश अंबादे (१६) व हिमांशू ईश्वर साखरे (१६) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. सुदैवाने मनीष समुद्रे (१३), रोहित पारेकर (१३) व साहिल वराडे (१३) हे तिघे जण थोडक्यात बचावले. सविस्तर असे की, नागपूर येथील समता मैदान, लष्करीबाग परिसरातील १४ शाळकरी मुले दुपारी १ वाजताच्या सुमारास महादेव घाट येथे सहलीसाठी आली होती. दरम्यान, कन्हान नदीच्या परिसरात एका झाडाखाली सर्वांनी डब्बा पार्टी केली. त्यानंतर अभिजित अंबादे, हिमांशू साखरे, मनीष समुद्रे, रोहित पारेकर, साहिल वराडे हे पाचही विद्यार्थी कन्हान नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी उतरले. यावेळी तेथील काहींनी त्यांना दमदाटी देऊन नदीपात्रात पोहण्यास मज्जाव केला. मात्र मुले पोहण्यासाठी म्हणून खोल डोहात उतरली. यात अभिजित व हिमांशू या दोघांचा बुडून मृत्यू झाला. इतर तिघांना सोबत असलेल्या अन्य विद्यार्थ्यांनी पाण्याबाहेर काढल्याने ते तिघेही थोडक्यात बचावले.दरम्यान, महादेव घाट कन्हान नदीपात्रातील डोहात दोन तरुण बुडाल्याबाबत जुने कामठी पोलिसांना माहिती देण्यात आली. लागलीच पोलीस उपनिरीक्षक श्वेता मिश्रा, नामदेव टेकाम, बाळासाहेब पालवे आदींनी घटनास्थळी दाखल झाले. हिमांशू नववीचा तर अभिजित बारावीचा विद्यार्थीमृत हिमांशू साखरे हा नागसेन विद्यालयात नववीचा विद्यार्थी होता तर अभिजित अंबादे याने नुकतीच बारावीची बोर्ड परीक्षा दिली होती. मौज म्हणून सहलीसाठी ते मित्रासमवेत महादेव घाट येथे आले होते. त्यातच ही दुर्दैवी घटना घडल्याने हिमांशू व अभिजितचा मृत्यू ओढवला. दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अशा अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोन विद्यार्थ्यांना जलसमाधी
By admin | Published: May 01, 2016 2:56 AM