सरकारचा निर्णय : प्रकल्पांच्या कामात पारदर्शकता येणार नागपूर : सिंचन प्रकल्पांची कामे अधिक दर्जेदार, गतिमान व पारदर्शक व्हावीत तसेच प्रकल्पाचा लाभार्थ्यांना अपेक्षित लाभ मिळावा, यासाठी जलसंपदा विभागाचे नियमित तांत्रिक परीक्षण व बांधकाम परीक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी त्रयस्थ सक्षम यंत्रणा निर्माण करून विभागाचे तांत्रिक परीक्षण व बांधकाम परीक्षण (आॅडिट) करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या नियंत्रणाखाली अस्तित्वात असलेल्या पाच दक्षता पथकांकडे सध्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रादेशिक कार्यालये, मंडळ व विभागीय कार्यालयांचे आॅडिट करण्याची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वातील तीन गुणनियंत्रक मंडळांवर कार्यक्षेत्रातील कामाच्या गुणनियंत्रणाबरोबरच बांधकाम आॅडिटची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रकल्पाची बांधकाम कालमर्यादा, खर्च व गुणवत्ता यावर नियंत्रण ठेवणे तसेच प्रकल्पाचे नियोजित लाभ मिळत आहे की नाही, याची खातरजमा के ली जाणार आहे. व्यवस्था दोष व तांत्रिक त्रुटी वेळीच शासनाच्या निदर्शनास याव्यात, त्यावर तातडीने उपाययोजना करणे शासनाला शक्य व्हावे, यासाठी आॅडिट व्यवस्था निर्माण केली जात आहे. यात तांत्रिक त्रुटीबाबत जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. निर्णय प्रक्रि येत पारदर्शकता आणून संभाव्य अनियमिततेला आळा घातला जाईल. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीविषयी जागरूकता निर्माण करण्यात येईल, याबाबतचे आदेश जलसंपदा विभागाचे उपसचिव र.ए. उपासनी यांनी काढले आहे.(प्रतिनिधी) तांत्रिक आॅडिटची कार्यपद्धती जलसंपदा विभागाच्या प्रत्येक प्रादेशिक कार्यालयाचे व मंडळ कार्यालयांचे तांत्रिक परीक्षण दरवर्षी क रण्यात यावे. विभागीय कार्यालयाचे तांत्रिक परीक्षण दोन वर्षांतून एकदा करण्यात यावे. परीक्षणामध्ये विविध स्तरावरील तांत्रिक मान्यता, निविदा मंजुरी, अतिरिक्त बाब दर सूची, निविदा याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी घेतेले निर्णय नियमानुसार असणे अपेक्षित आहे. शासनाने निर्देशित केल्यास दक्षता पथक याबाबतचा अहवाल शासनाला सादर करेल. अस्तित्वातील तीन गुणनियंत्रण मंडळाकडे त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामांबाबतचे गुणनियंत्रणाबरोबरच बांधकाम आॅडिट करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एखाद्या कामाबाबत शंका निर्माण झाल्यास व प्राथमिक चौकशीत निदर्शनास आल्यास कामाचे आॅडिट केले जाणार आहे. करण्यात आलेले काम खर्चाच्या सुसंगत आहे की नाही, याची चौकशी क रण्यात येईल. ग्रामविकास व जलसंपदा विभागांतर्गत गुण नियंत्रण मंडळे व पथके गठित करण्यात येतील. यासाठी पाच दक्षता पथकाच्या सुधारित आकृतिबंधाला मंजुरी देण्यात आली आहे.
जलसंपदाच्या कामाचे होणार आॅडिट
By admin | Published: July 27, 2016 2:47 AM