नागपूर : प्रतिकूल वातावरण व नष्ट होत असलेल्या पायाभूत संरचना यामुळे ग्रामीण भागात समाधानकारक पर्जन्यमान होऊनही दरवर्षी भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. किंबहुना ग्रामीण महिलांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीटही करावी लागते. हा त्रास कमी व्हावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावी यासह अन्य बाबींसाठी नागपूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने प्रत्येक गावात पाण्याचा ‘संगीतमय जागर’ होणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा प्रयोग नागपूर जिल्ह्यात होत आहे. यात लोकगीताच्या माध्यमातून गावकऱ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. काळाच्या ओघात नागरीकरणासोबतच नळ योजना आल्या आणि पाण्याचे गावातील परंपरागत स्रोत अर्थात सार्वजनिक विहिरी कालबाह्य झाल्या. पर्यायाने अख्खे गाव नळयोजनेच्या पाण्यावर विसंबून राहिले. २४ तास पाणीपुरवठा सारख्या योजना गावागावात पोहचल्या. पाण्याचा वापर आणि अपव्यय यावरही कुणाचेही नियंत्रण राहिले नाही. गावकऱ्यांनीही पाण्याच्या वापरासंदर्भात गांभीर्याने घेतले नाही. त्याचा फटका दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या रूपाने बसतो आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याची समस्या निकाली काढतानाच ग्रामीण जनतेला पाण्याविषयक बाबींची माहिती देणे गरजेचे असल्याच्या दृष्टिकोनातून ग्रामस्थांना जलसाक्षर केल्यास भविष्यातील जलसंकटाला तोंड देता येईल, या उद्देशाने पिण्याच्या पाण्याविषयी गीताच्या माध्यमातून प्रचार-प्रसार क रण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन कक्षाच्या माहिती, शिक्षण व संवाद शाखेने संगीतातून ग्रामस्थांना साक्षर करण्याचा उपक्रम राबविला आहे. यात नियमित पाणीपट्टी भरा, देखभाल दुरुस्ती, नळगळती थांबवा, प्रत्येकाने वैयक्तिक नळ जोडणी घेऊन फक्त आवश्यक बाबींसाठीच उपयोगापुरता पाण्याचा साठा करा, आदी विषयांवर गीत रचून त्याला संगीतबद्ध करून, त्याच्या सीडी प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध साऊंड सिस्टिमच्या माध्यमातून दररोज सकाळी आणि संध्याकाळी सीडी वाजविली जाणार आहे. (प्रतिनिधी)
लोकगीतातून पाणी बचतीचा जागर
By admin | Published: December 30, 2015 3:17 AM