नागपूर : २३०० मिलिमीटरच्या लाईनमध्ये पाच ठिकाणी गळती थांबविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ३० दिवसात हे काम करावयाचे होते. परंतु हे काम १२ दिवसातच पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे ५४ एमएलडी पाणी वाया जाण्यापासून वाचविण्यात आले असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.
महापौरांनी सांगितले की, जलसंपदा विभागाच्या वतीने पाणीगळती दुरुस्त करण्यासाठी परवानगी मिळत नव्हती. परवानगी मिळताच दुरुस्तीचे काम करण्यात आले. स्थायी समितीचे अध्यक्ष व जलप्रदाय समिती सभापती विजय झलके यांनी सांगितले की, ५ ठिकाणी गळती दुरुस्त करण्यासोबत ७ ठिकाणी फ्लो मीटर लावण्यात येणार होते. गळती सर्व ठिकाणी सुधारण्यात आली आहे. तर ६ ठिकाणी फ्लो मीटर लावण्यात आले आहे. एक फ्लो मीटर येण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. यामुळे त्यास स्थगित करण्यात आले आहे. झलके यांनी सांगितले की, पाणीगळती दुरुस्त करण्यासाठी ६ जानेवारीपासून शहरातील ६५ टक्के भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. पेंच जलाशयातून २३०० मिलिमीटर लाईनमधून दररोज ४६० एमएलडी पाणी शहरात पोहोचते. दुरुस्तीच्या कामामुळे लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, गांधीबाग, मंगळवारी झोनसह सतरंजीपुराच्या काही भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात आला. २७ किलोमीटर लांब पाईपलाईनमध्ये इटगाव, करंभाडमध्ये लिकेज स्पॉट होते. हळूहळू गळती वाढत होती. नवेगाव खैरी ते महादुला दरम्यान ४८ किलोमीटर कॅनलच्या माध्यमातून पाणी शहरात पोहोचत आहे.
.........