नागपूर : नागपूरसह विदर्भात दिवसेनदिवस तापमानामध्ये वाढ होत आहे. मागील काही दिवसात नागपूरचा पारा ४४ ते ४५ अंशावर पोहचला आहे. त्यात ग्रामीण भागात जल जीवन मिशन (जेजेएम) अंतर्गत करण्यात येणारी कामे अनेक गावांत पूर्णत्वास आलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण जनतेला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक झळ हिंगणा व पारशिवनी तालुक्यांना बसली आहे. १४ हून अधिक गावांमध्ये सुमारे ३७ हजारांहून अधिक नागरिकांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे.
केंद्र शासनाने २०२४ पर्यंत प्रत्येक घरी नळाव्दारे पाणी पुरवठ्याचे ध्येय निश्चित केले आहे. त्यानुसार देशभरात जल जीवन मिशन (जेजेएम) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात जेजेएमच्या माध्यमातून १३४४ गावांमध्ये कोट्यावधीच्या निधीतून कामे सुरू आहे. जवळपास ४०० गावांतील कामे पूर्णत्वास आल्याचे सांगण्यात येते. बहुसंख्य कामे अद्यापही सुरूच झालेली नाही. त्यात उन्हाची तीव्रता दिवसेनदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाई भीषण झाली आहे़ विहीर आणि बोअरवेलची पाणी पातळी तळाशी गेल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती घालावी लागत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील पारशिवनी आणि हिंगणा तालुक्यात सुमारे ३७ हजारांहून अधिक नागरिकांची १४ टँकरच्या माध्यमातून तहाण भागवावी लागत आहे.
या गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा हिंगणा तालुक्यातील धानोली गुमगाव, सुकळी कलार, धानाली कवडस, नवेगाव, डेगमा खुर्द (अंबाझरी, शेषनगर,कवडस), खापा निपाणी, इसासनी, नागलवाडी, वडधामना तर पारशिवनीतील चारगाव, निमखेडा आणि ढवळापूर या १४ गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे. यातील इसासनी हे दहा हजार २०० तर वडधामना हे १२ हजार लोकसंख्येची सर्वांत मोठी गावे आहेत़ पाणीटंचाई निवारणासाठी ३५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून १७५ बेरवेलचे फ्लॅशिंग करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली.