कामठी : कामठी तालुक्यातील शिरपूर येथील पाण्याच्या टाकीची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे ही टाकी कोसळण्यापूर्वी येथे तातडीने नवीन टाकीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शिरपूर येथे पंधरा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. या टाकीची योग्य देखभाल दुरुस्ती न झाल्याने पाणीगळती सुरू झाली आहे. त्यामुळे टाकीसभोवताली शेवाळ लागले आहे. सततच्या गळतीमुळे ही टाकी कधीही कोसळण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपूर्वी दूषित पाणीपुरवठ्यामुळे गावात गॅस्ट्रो रोगाची मोठ्या प्रमाणात लागण झाली होती. आताही प्रशासनाने लक्ष न दिल्यास तीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्याने पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सहा लाख रुपयांचा निधी नवीन टाकी बांधकामाकरिता मंजूर झाला आहे. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे नवीन टाकी बांधकामाला सुरुवात करता आली नाही. पाणीपुरवठा विभागाच्या वतीने त्वरित नवीन पाणी टाकीचे बांधकाम सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ही समस्या निकालात न निघाल्यास स्थानिक शिवसैनिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नवीन टाकीचे बांधकाम होईपर्यंत प्रशासनाने जुन्या पाणी टाकीची साफसफाई व दुरुस्तीचे काम प्रशासनाने तातडीने करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा वाहतूक विभाग उपप्रमुख सचिन वानखेडे, विलास ढेगरे, कवडू वानखेडे, ऋषी रिठे, राजा जुमडे, वामन जुमडे, राकेश ठाकरे व ग्रामस्थांनी केली आहे.