सेवा बंद केल्यामुळे वॉटर टँकर मालक हायकोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 12:46 AM2020-05-30T00:46:10+5:302020-05-30T00:47:36+5:30
पाणीपुरवठ्याकरिता सेवा घेणे बंद करण्यात आल्यामुळे अरविंद गोरले व इतर २० टँकर मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त व वॉटर वर्कचे कार्यकारी अभियंता यांना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाणीपुरवठ्याकरिता सेवा घेणे बंद करण्यात आल्यामुळे अरविंद गोरले व इतर २० टँकर मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त व वॉटर वर्कचे कार्यकारी अभियंता यांना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २३ जून २०१६ रोजीच्या ई-टेंडरनुसार शहरातील पाणी टंचाईच्या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर मालकांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर १७ आॅक्टोबर २०१६ रोजी स्थायी समितीने या टँकर मालकांना पाणीपुरवठ्याच्या समान फेऱ्या वाटप करण्याविषयी ठराव पारित केला. गेल्या मार्चपर्यंत या ठरावानुसार सेवा सुरू होती. परंतु, मार्च-२०२० मध्ये अचानक १२० टँकर मालकांची सेवा बंद करण्यात आली. त्यात याचिकाकर्त्यांचा समावेश आहे. हा निर्णय घेताना टँकर मालकांना नोटीस देण्यात आली नाही. हा निर्णय रद्द करण्यासाठी मनपाला निवेदन देण्यात आले, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. या निर्णयामुळे याचिकाकर्ते कामापासून वंचित झाले आहेत. त्यांनी कर्ज घेऊन टँकर खरेदी केले असून या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण अवलंबून आहे. मनपाने काही विशिष्ट टँकर मालकांना लाभ पोहचविण्यासाठी वादग्रस्त निर्णय घेतला आहे. करिता, वादग्रस्त निर्णय रद्द करून याचिकाकर्त्यांना पाणीपुरवठ्याच्या फेऱ्या वाटप करण्यात याव्यात असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. श्रद्धानंद भुतडा यांनी बाजू मांडली.