नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : घाम फोडणाऱ्या उन्हाळ्यात रेल्वे प्रवाशांना प्रत्येक स्थानकावर शुद्ध आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, ज्या परिसरात तीव्र पाणी टंचाई आहे, अशा ठिकाणच्या रेल्वे स्थानकावर पाण्याचे टँकर तैनात करण्यात येणार आहेत.
उन्हाळा सुरू झाला आहे. जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे सध्या मराठवाडा आणि विदर्भात वातावरण थंडगार असले तरी लवकरच उन्हाच्या झळा सुरू होणार आहे. त्या वाढतच जाणार असून उन्हाळ्यात अनेक रेल्वे स्थानकावर नळाला पाणी नसते.
उष्णतेच्या लाटेमुळे काही ठिकाणी नळातून गरम पाणी मिळते. गर्दीत प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांचा जीव गरमी आणि गर्दीमुळे पाणी पाणी करतो. त्यामुळे रेल्वे स्थानकावरच्या नळावर पाणी घेण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडते. अशावेळी नळातून प्रवाशांना थंड आणि शुद्ध पाणी मिळावे म्हणून रेल्वे प्रशासनाने खास उपाययोजना करण्याचे निर्देश ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानक प्रमुखांना दिले आहेत. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या ४३४ स्थानकांवर ८०९३ पाण्याचे नळ, ४९८ वॉटर कूलर आणि १४९ नलिका विहिरींची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी नळ, वॉटर कुलर आणि कूपनलिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्या परिसरात तीव्र पाणी टंचाई आहे, अशा ठिकाणच्या रेल्वे स्थानकावर पाण्याचे टँकर तैनात करण्यात येणार आहेत.
विभागवार साधन उपलब्धता
मुंबई विभाग : १२०० पाण्याचे नळ, २४५ वॉटर कुलर आणि १० कूपनलिका पुणे विभाग : १०७४ पाण्याचे नळ, ४७ वॉटर कुलर आणि १५ कूपनलिका नागपूर विभाग : २३६० पाण्याचे नळ, ६१ वॉटर कुलर आणि १८ कूपनलिका भुसावळ विभाग : २५१९ पाण्याचे नळ, १०७ वॉटर कुलर आणि ५६ कूपनलिका सोलापूर विभाग : ९४० पाण्याचे नळ, ३८ वॉटर कुलर आणि ५० कूपनलिका महिला बचत गटाचीही मदत घेणार
स्वयंसेवी संस्था आणि महिला बचत मदत गट, स्काउट्स आणि गाईड्स यांची मदत घेऊन थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे अधिकारी महानगरपालिका / राज्य सरकारांशी समन्वय करून पर्यायी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करवून घेणार आहे. रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था २४ / ७ राहावी. काही समस्या निर्माण झाल्यास आरडाओरड होऊ नये म्हणून देखरेखीसाठी २४ तास रेल्वे कर्मचाऱ्यांची चमू कार्यरत राहणार आहे.