४०० हून अधिक टँकरने शहरात होतोय पाणीपुरवठा : आऊटरमध्ये नागरिक त्रस्तराजीव सिंह नागपूरपारा चढू लागताच शहरात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शहरातील बाह्य भागात तर स्थिती चिंताजनक बनली आहे. जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना आता पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून टँकरमुक्तीचा दावा करणाऱ्या महापालिकेचा दावा फोल ठरताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी टँकरची मागणी वाढली असून, फेऱ्याही वाढल्या आहेत. जलवाहिनी असलेल्या व नसलेल्या भागात सध्या ४०० हून अधिक टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत. असे असले तरी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना कारावा लागत आहे. महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नॉन नेटवर्क भागात २७८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या उन्हाळ्यात नॉन नेटवर्क असलेल्या भागात २२० ते २३५ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. याशिवाय नेटवर्क असलेल्या भागात ९० टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. याशिवाय गेल्या वर्षी महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळामध्ये ७६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यावरून हे सिद्ध होते की, टँकरने पाणीपुरवठा बंद करणे तूर्तास शक्य नाही. शहरातील प्रत्येक भागात जलवाहिनी टाकली जात नाही व त्याद्वारे पाणीपुरवठा होत नाही तोवर टँकर बंद करणे शक्य नाही. टँकरच्या वाढलेल्या फेऱ्यांबाबत विचारणा केली असता जलप्रदाय विभागाचे म्हणणे आहे की, पूर्वी एका टँकरद्वारे १० फेऱ्या केल्या जात होत्या, आता फक्त सात फेऱ्यांची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढलेली दिसत आहे. उन्हाळा तापू लागताच शहराच्या बाह्य भागात टँकरची मागणी वाढली आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढविण्यात आल्याचेही विभागाचे म्हणणे आहे. शहरातील पाणी टंचाईबाबत गेल्या आठवड्यात विरोधी पक्षाने महापौरांच्या कक्षात मडके फोडले. धरणे दिले. घोषणाबाजी केली. तर सत्तापक्षातील काही नगरसेवकांनी शहरात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. त्यावर पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. (प्रतिनिधी)पाण्याचे पैसे वसूलणे कठीणज्या भागात टँकरने पाणीपुरवठा होत आहे तेथे फक्त पाण्याचे पैसे वसूल करा, असा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत पारित करण्यात आला आहे. विरोधकांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. या मुद्यावर पुढे संघर्ष करण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात तरी टँकरने दिल्या जाणाऱ्या पाण्याचे पैसे वसूल करण्याची चिन्हे कमीच आहेत. पाणी टंचाई नाही : द्रवेकरपाणीपुरवठा कंपनी ओसीडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी सचिन द्रवेकर यांनी सांगितले की सद्यस्थितीत शहरात नियमित व पुरेसा पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात दररोज सुमारे ७१० दलघमी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात पाणी समस्या नाही. नवेगांव खैरी व तोतलाडोह जलाशयात पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध असल्याचे सिंचन विभागाने कळविले आहे, असेही त्यांनी सांगितले.
पाण्यासाठी टँकरवारी
By admin | Published: April 16, 2017 1:27 AM