लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऊन वाढताच पाण्याच्या टँकरच्या मागणीतही वाढ झाली आहे. परंतु वसाहतींच्या गल्ली बोळ्यातून हजारो टन पाणी वाहून नेणारे अनेक टँकर ‘अनफिट’ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तहान भागविणारे टँकरच नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे वास्तव आहे.वाढत्या रस्ते अपघातांची कारणे विविध असली तरी यातील महत्त्वाचा भाग म्हणजे वाहनाचा फिटनेस. हा उत्तम असल्यास बहुतांशवेळा अपघात टाळता येतो; मात्र शहराच्या गल्ली-बोळ्यात लोकांची तहान भागविणाऱ्या बहुसंख्य टँकरचालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) फिटनेस सर्टिफिकेटच (योग्यता प्रमाणपत्र) घेतले नाही. यामुळे हे टँकर कर्दनकाळ ठरत आहे. महापालिकेनेही योग्यता प्रमाणपत्राची तपासणी न करताच कंत्राट दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.योग्यता प्रमाणपत्र जारी करण्यासाठी केंद्र शासनाचे काही नियम आहेत. त्याअंतर्गत वाहनाची प्रत्यक्ष चाचणी आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकाकडून करणे बंधनकारक आहे. या चाचणीत वाहनाचा ब्रेक, हेडलाईट, गेअर, वाहनाची स्थिती, क्षमता व इतर गोष्टी प्रत्यक्षपणे तपासल्या जातात.मात्र बहुसंख्य टँकरचालक याकडे लक्षच देत नाही. कारवाईही होत नसल्याने टँकरचालकांना रान मोकळे झाले आहे. तीन वर्षांपूर्वी एका टँकर चालकाने दोन विद्यार्थिनींना जबर धडक दिली. यात एकीचा करुण अंत तर दुसरी गंभीर जखमी झाली होती. यानंतर आरटीओ कार्यालयाकडून टँकरची तपासणी मोहीम हाती घेतली. या कारवाईमुळे टँकर चालकाचे धाबे दणाणले होते.परंतु नंतर कारवाईची मोहीम थंड पडल्याने जास्तीत जास्त फेऱ्या मिळण्यासाठी टँकर भरधाव धावत असल्याचे चित्र सामान्य झाले आहे. विशेष म्हणजे, आरटीओने किती टँकर चालकांना फिटनेस सर्टिफिकेट दिले याची नोंदही नसल्याचे समोर आले आहे.
कंत्राट देण्यापूर्वी तपासणीच झाली नाहीमहापालिकेने टँकरमालकाला कंत्राट देण्यापूर्वी त्याच्या वाहनाची तपासणी आरटीओकडून करून घेणे आवश्यक असते. परंतु तसे होत नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. यामुळे खराब स्थितीतील टँकरही आज रस्त्यावर धावत आहे.