नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - मानाची सरकारी नोकरी आणि लठ्ठ पगार असूनही वरकमाईसाठी बहुतांश सरकारी अधिकारी-कर्मचारी चटावलेलेच असतात. पैशाचा लोभ धोका पोहचवू शकतो, हे माहीत असूनही ते तो धोका पत्करतात अन् नंतर कोठडीत पोहचतात. वर्षभरात (२०२०) अशा प्रकारे ७२ जणांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पकडले. त्यात ६१ जण सरकारी नोकर आहेत, हे विशेष.
सरकारी नोकरी म्हणजे, सर्वच सुखासुखी. चाकोरीबद्ध वेळेतील काम, भरपूर सुट्या अन् चांगला पगार. त्यामुळे समाजातही मानपान. लग्नासाठी वधूपित्याची प्रथम पसंती सरकारी नोकरी करणाऱ्यालाच. व्यापाऱ्याकडेही त्याची पत अन् बँकाही कर्ज देण्यास हात जोडून तयार. त्यामुळे सरकारी नोकरी मिळविण्यासाठी सारेच बेरोजगार प्रयत्नशील असतात. त्यातील काहींचे नशीब फळफळते अन् त्याला सरकारी नोकरी मिळते. नोकरी मिळाल्याच्या काही दिवसानंतर त्याला वरकमाईचा मार्ग दिसतो. हा मार्ग थेट कोठडीत नेऊन सोडणारा आहे, याची त्याला चांगली कल्पना असते. परंतु लालसा धोका पत्करायला भाग पाडते. अन् दोन-चारवेळा वरकमाईची रक्कम खिशात आली की सरकारी नोकरदार (लोकसेवक) निर्ढावतात. त्यातून ते गरजू व्यक्तींना नाहक त्रास देतात. काम करून देण्यापूर्वी त्याच्याकडे हात पसरतात. संबंधित व्यक्तीला खेटे घालायला भाग पाडतात. लाचेची रक्कम दिल्याशिवाय त्याचे कामच करून देत नाही. दरम्यान, लाचेची मागणीही अव्वाच्यासव्वा असते. त्यामुळे पीडित व्यक्ती थेट एसीबीचे कार्यालय गाठतो अन् नंतर एसीबी त्या भ्रष्ट लोकसेवकाच्या मुसक्या आवळतात. त्याला कोठडीत डांबतात. कारवाईमुळे त्याची नोकरीही जाते अन् समाजात नाचक्की झाल्याने प्रतिष्ठाही धुळीस मिळते. तरीसुद्धा भ्रष्ट मंडळी जुमानायला तयार नाहीत. २०२० मध्ये कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असताना भ्रष्ट सरकारी नोकर खाबुगिरी सोडायला तयार नव्हते. अशा एकूण ६१ सरकारी नोकरदारांना गेल्या वर्षी एसीबीने जेरबंद केले आहे.
----
वयोगटाचा मुद्दाच नाही
अमूक एका वयोगटातील मंडळी कमी अन् तमूक वयोगटातील मंडळी कमी किंवा जास्त लाच मागते, असे काहीही नाही. ज्याच्या हातात फाईल आहे, तो लाचेच्या रकमेसाठी हात पुढे करताना दिसतो. गेल्या तीन वर्षांत पकडलेल्या १६६ भ्रष्ट लोकसेवकांमध्ये ११ महिन्यापूर्वीच नोकरीवर लागलेल्या आणि निवृत्तीला ३ महिने शिल्लक असणाऱ्या भ्रष्ट नोकरदारांचाही समावेश आहे.
---
तीन वर्षात एसीबीच्या जाळ्यात अडकलेले लोकसेवक
२०१९ - ०९२
२०२० - ०६१
२०२१ - ०१३
----------
सरकारी नोकरीत असलेले अर्थात लोकसेवकाने प्रत्येक नागरिकाचे काम तत्परतेने पूर्ण करून द्यायला हवे. त्याचसाठी त्याला पगार मिळतो. पैशाच्या लालसेने कुणी काम अडवून धरत असेल किंवा गरजू व्यक्तीला नाहक त्रास देत असेल तर अशा भ्रष्ट सरकारी नोकरांच्या आमच्याकडे तक्रारी कराव्यात. त्यांचा आम्ही बंदोबस्त करू.
रश्मी नांदेडकर
पोलीस अधीक्षक, एसीबी नागपूर.
----