लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : तालुक्यातील काही भागात साेयाबीनच्या पिकावर खाेडमाशीसाेबतच येल्लाे माेझॅक या राेगाचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. काही शेतात या दाेन्हीसह मावा व चक्रीभुंग्याचाही प्रादुर्भाव झाला आहे. ही येल्लाे माेझॅकची सुरुवात असली तरी हा राेग झपाट्याने पसरत असल्याने साेयाबीनचे पीक नष्ट हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी नुकतीच काटाेल तालुक्यातील पानवाडी, हरणखुरी, ढवळापूर यासह अन्य शिवारातील साेयाबीनच्या पिकाची प्रत्यक्ष पाहणी करीत शेतकऱ्यांना कीड व राेग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. धनराज कोठे यांच्या हरणखुरी शिवारातील शेतातील सोयाबीनवर येल्लाे माेझॅक, सुरेंद्र पडोलिया, हरणखुरी, बाबाराव कुमेरिया, पानवाडी यांच्या शेतातील सोयाबीनवर खोडमाशी, पांढरीमाशी, मावा व चक्रभुंगा या किडींचा तसेच राजेश फिस्के, ढवळापूर यांच्या संत्राबागेत फळगळ हाेत असल्याचे दिसून आले, असे डाॅ. प्रदीप दवणे यांनी सांगितले.
येल्लाे माेझॅकचा प्रादुर्भाव झाल्यास सुरुवातीला पानावर पिवळे चट्टे दिसतात, नंतर पानावर चमकदार पिवळ्या रंगाचे मोठ्या आकाराचे पट्टे दिसतात. त्यानंतर संपूर्ण पाने पिवळी हाेतात. या राेगाचा प्रसार मुख्यतः रोगग्रस्त बियाण्यांद्वारे व दुय्यम प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होताे. गेल्या महिन्यात सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आला हाेता, असेही डाॅ. प्रदीप दवणे यांनी सांगितले.
या दाैऱ्यात त्यांच्यासाेबत तालुका कृषी अधिकारी सुरेश कन्नाके, पंचायत समिती उपसभापती अनुराधा खराडे, सदस्य पंचायत समिती संजय डांगोरे, मंडळ कृषी अधिकारी सागर अहिरे, कृषी पर्यवेक्षक ए. सी. मानकर, कृषिसेवक ईशान सुदामे सहभागी झाले हाेते.
...
साेयाबीनवरील उपाययोजना
शेतातील राेग व कीडग्रस्त झाडे उपटून नष्ट करावी. पीक व धुऱ्यावरील गवत काढून टाकावे. पांढरी माशी व मावाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात पिवळे चिकट एकरी १० ते १५ सापळे लावावे. त्यांची उंची पिकाएवढी असावी. कीटकनाशकांचा वापर करावयाचा झाल्यास इमिडाक्लोप्रीडची फवारणी करावी, असेही डाॅ. प्रदीप दवणे यांनी सांगितले.
...
फळगळीवरील उपाययाेजना
संत्रा, माेसंबीची फळगळ रोखण्यासाठी फॉसेटिस एलुमिनियम किंवा मेफेनोक्झाम एमझेड याची फवारणी करावी. बोर्देक मिक्चर (एक किलो चुना, ६०० ग्रॅम मोरचूद याचे द्रावण) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईडची फवारणी करावी. देठ सुखीवर याच द्रावणाची आठ दिवसाच्या अंतराने नियमित फवारणी करावी, असेही डाॅ. प्रदीप दवणे यांनी सांगितले.