नागपूर : वेकोलिच्या (वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड) लाचखोर अभियंत्याला ‘सीबीआय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. वणी येथील निलजय उपविभागाचा इंचार्ज असलेल्या अभियंत्याचे नाव बी.यु.वाघमारे असे असून कंत्राटदाराकडून देयकाच्या मंजुरीसाठी लाच मागितली होती. त्याला अटक केल्यानंतर त्याचे कार्यालय व घराचीदेखील झडती घेण्यात आली.
वेकोलिच्या निलजय उपविभागातील नायगाव मुख्य मार्गावरील खड्डेदुरुस्ती तसेच वर्धा नदीवर जीआय शीट्स टाकण्याचे कंत्राट चंद्रपूरच्या एका कंत्राटदाराला देण्यात आले होते. या कामाच्या ३९ लाख रुपयांच्या देयकांना मंजुरी देण्यासाठी अर्ज केला असता वाघमारेने कंत्राटदाराला १४ हजार रुपयांची लाच मागितली. पैसे दिल्यावरच देयकांना मंजुरी देण्यात येईल, अशी भूमिका त्याने घेतली होती. कंत्राटदाराने यासंदर्भात २३ सप्टेंबर रोजी थेट सीबीआयकडेच तक्रार केली. यानंतर सीबीआय नागपूर कार्यालयाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची चौकशी केली. तक्रारीत तथ्य असल्याचे आढळल्यावर सापळा रचण्यात आला.
तक्रारदार कंत्राटदाराने १४ हजार देणे शक्य नसल्याचे सांगत १० हजार रुपये देण्याची तयारी दाखविली. वाघमारे त्यासाठी तयार झाला व त्याने कंत्राटदाराला पैसे घेऊन बोलविले. कंत्राटदाराने वाघमारेच्या हाती पैसे देताच सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. वाघमारेला अटक केल्यानंतर सीबीआयने त्याचे कार्यालय व घराचीदेखील झडती घेतली. यासंदर्भात पुढील तपास सुरू असल्याची माहिती सीबीआयचे नागपूर कार्यालय प्रमुख एम.एस.खान यांनी पत्रकाच्या माध्यमातून दिली. वाघमारेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून डीएसपी नीरज कुमार गुप्ता हे पुढील तपास करत आहेत.