- ९४वे साहित्य संमेलन : महामंडळाच्या आजी अध्यक्षांवर माजी अध्यक्षांचा काव्यमय प्रहार
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवघ्या सात दिवसात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाचा वाद संपला असला तरी या वादातून व्यक्त झालेले शल्य निवळलेले नाही. मुळात हा वाद अहंकार विरूद्ध वस्तुस्थिती असाच आहे, हे अनेकार्थाने स्पष्ट झाले. या सबंध प्रकरणावर आतापर्यंत जाहीररित्या व्यक्त न झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी शेलक्या पण काव्यमय शब्दांत प्रहार करत विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या मिशा उपटल्या आहेत.
या कवितेत जोशी यांनी ठाले पाटील यांच्या एकाधिकारशाहीवर कटाक्ष टाकला आहे. महामंडळाची लगाम हाती आल्यावर स्वत:च्या स्वार्थासाठी आणि आनंदासाठी कसा वापर केला जात आहे आणि महत्कार्याला कशी हरताळ फासली जात आहे, याचे वर्णन त्यांनी केले आहे. आमच्याच घरात आम्ही राजे, वेस ओलांडली तर आम्ही खुजे... असे वर्तन विद्यमान अध्यक्षांचे असल्याचा भाव माजी अध्यक्षांनी या कवितेमार्फत व्यक्त केला आहे. जोशी यांनी केलेला हा काव्यमय कटाक्ष वर्तमानासंदर्भात वाटत असला तरी या कटाक्षाचे मूळ खोलात असल्याचे दिसून येते. महामंडळाच्या घटनेप्रमाणे दर तीन वर्षांनी कार्यालय घटक संस्थांकडे वळते होते. दोन वर्षापूर्वी विदर्भ साहित्य संघाकडून हे कार्यालय मराठवाडा साहित्य परिषदेकडे गेले आणि अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारताच कौतिकरावांनी आपला हेका दाखविण्यास सुरुवात केली. वि.सा.संघाकडे कार्यालय असताना जोशी हे अध्यक्ष होते आणि त्यांच्या कार्यकाळात महामंडळाच्या धोरणात त्यांनी केलेल्या सुधारणांना कौतिकरावांनी केराची टोपली दाखवण्यास सुरुवात केली. हे उस्मानाबाद येथे पार पडलेल्या ९३ व्या संमेलनाच्या एकूणच नियोजनावरून स्पष्ट झाले. त्यावर बोट ठेवताच कौतिकरावांनी जोशी यांना ठेंगा दाखवला होता. त्यानंतर ९४ व्या संमेलनावरून सुरू झालेल्या स्थळ निवडीच्या वादावर जोशी यांनी अप्रत्यक्षपणे क्लेष जाहीर केला आहे.
जोशी यांचा काव्यमय प्रहार
राजधानीत नको आहे करायला आमचा उत्सव आम्हाला,
अहो, तिथे गेल्यावर विचारणार कोण आम्हाला?
तुमच्या कौतुकासाठी नाही आम्ही,
आमच्या कौतुकासाठीच तेवढे आहोत आम्ही!
आम्ही आणि आमचा आनंद काय ते बघून घेऊ,
तुम्हाला कशाला तो मिळू देऊ?
त्यासाठीच उत्तम आहेत
आमच्या गढ्या-आमचे वाडे,
आमचेच गाव-भाग आमचा!
निर्णय घेणारे आम्ही, घेऊ देणारेही आम्ही
संबंधच मुळात काय तुमचा?
सांगितलेच कोणी जपायला व्यापकांचे व्यापक हित?
तेच आमच्या हिताआड येते...
अशा लोकांचे नसते उद्योग हे,
आमची चैन ओढून नेते...
नियम मोडूनच मिळवता येते वेगाने हवे ते,
नियम पाळून फक्त सभ्य तेवढे राहता येते...
आता राहिले नाहीत ते दिवस,
प्रत्येक गोष्टीची हवस, हाच युगधर्म आहे...
त्या विरूद्ध करणे काहीही,
हाच मुळात अधर्म आहे...
तो आम्ही करणार नाही,
युगधार्मिक आहोत आम्ही,
त्याच्या विरुद्ध जाणार नाही...
तुमचे नियम, धर्म तुमचा,
तुम्ही पाळा अथवा टाळा,
आम्ही फासून घेऊ पुनः,
आमचा आवडता रंग काळा...
- श्रीपाद भालचंद्र जोशी, माजी अध्यक्ष - अ.भा. मराठी साहित्य महामंडळ
.........