नागपूर : आम्ही आजही शिवसेनेतच आहोत, आम्ही फक्त गटनेता बदलला आहे असे खासदार कृपाल तुमाने म्हणाले. ते आज नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
काही दिवसांपूर्वीच आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत, असे सांगणारे रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. यावर विचारले असता आम्ही शिवसेनेतच असून फक्त गटनेता बदलला आहे, असे स्पष्टीकरण तुमाने यांनी दिले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही गेल्या वेळी भाजपसोबत निवडणूक लढवली होती. आम्ही सर्व १२ खासदार शिवसेनेतच आहोत. आम्ही नाराज होतो कारण आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत होतो. आमचे विचार काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जुळणारे नाहीत. दहशतवाद्यांना मदत करणारे मंत्रिमंडळात होते. मी उद्धव ठाकरे यांना पाच वेळा भेटलो. मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, असंही तुमाने यांनी सांगितलं.
नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार शिंदे गटात
विनायक राऊत यांचा भयानक त्रास होता. विनायक राऊत आम्हाला सभागृहात बोलू देत नव्हते. गेल्या एक वर्षांपासून विनायक राऊत यांनी बुधवारची बैठक घेतली नाही. विनायक राऊत यांना हटवण्याचं काम गेल्या अधिवेशनातंच होणार होतं. असे सांगतांनाच, उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. पण शरद पवार यांनी त्यांना जबरदस्तीने मुख्यमंत्री केलं असेही खळबळजनक विधान तुमाने यांनी केले. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायचा काही प्रश्नंच येत नाही. महाविकास आघाडीतून बाहेर पडा हीच आमची मागणी होती, असेही तुमाने यावेळी म्हणाले.