भिवापूर : कुणाचे वय १९ तर कुणाचे ७५ पार! कोरोना फुफ्फुसात शिरल्याने ऑक्सिजन लेव्हल कमी झाली. एका मुलीचे हिमोग्लोबीन केवळ २ असल्यामुळे चालणे, बोलणे आणि श्वासासाठी अक्षरश: तिचा लढा सुरू होता. अशा धास्तावलेल्या पॉझिटिव्ह रुग्णात सकारात्मक विचार पेरत आवश्यक औषधोपचारांनी हे रुग्ण आता ठणठणीत झाले. बुधवारी कोविड सेंटरमधून बाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. ‘आम्ही लढलो, जिंकलो... कोरोना हरला’ असे शब्द त्यांच्या ओठात होते. ‘डॉक्टर, तुम्ही खरंच देवदूत आहात’ असा मनोदयही हे रुग्ण व्यक्त करीत होते. स्थानिक कोविड केअर सेंटरमधील सोयीसुविधा, डॉक्टरांकडून होणारे योग्य उपचार आणि रुग्णांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी सुसंवाद यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनावर यशस्वीरीत्या मात करीत आहेत. त्यामुळेच भिवापूरच्या कोविड सेंटरचे नाव सध्या जिल्ह्यात अग्रस्थानी आहे. अनेक पॉझिटिव्ह रुग्ण तपासणी करण्याचे टाळतात. त्यामुळे संसर्ग फुफ्फुसापर्यंत पोहोचतो आणि मृत्यूच्या दाढेत ओढल्या जातात. अशा रुग्णापर्यंत पॉझिटिव्ह विचार पोहोचावे. त्यांनी वेळीच तपासणी करून आरोग्यसेवा व औषधोपचाराच्या कक्षेत यावे. यासाठी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी बुधवारी कोविड सेंटरच्या परिसरात ‘अनुभव कथन’ अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. दर्शना गणवीर, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर आदी उपस्थित होते. यावेळी कोविड केअर सेंटरमधील अनुभव रुग्णांनी सांगितले, शिवाय हे अनुभव इतर रुग्णांना सांगून कोरोनावर मात करता येते. मात्र त्यासाठी वेळीच उपचार घ्यावे लागतात, असे आवाहनही या अधिकाऱ्यांनी केले.
७५ वर्षांच्या आजी ठणठणीत
उमरेड येथील ७५ वर्षीय सुलोचना वंजारी या स्थानिक कोविड सेंटरमध्ये दाखल होत्या. त्यांचा स्कोअर १६ आणि ऑक्सिजन लेव्हल ८० होती. अशाही थकत्या वयात त्यांनी आत्मविश्वासाच्या बळावर कोरोनाला हरविले. येथील डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी रुग्णांच्या सुदृढ आरेग्यासाठी मोठे परिश्रम घेत असल्याचेही सुलोचना यांनी सांगितले.
हिमोग्लोबीन केवळ २
स्थानिक रोशनी धनविजय या १९ वर्षांच्या मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोविड सेंटरमध्ये आली तेव्हा हिमोग्लोबीन केवळ २ होते. त्यामुळे येथे उपचार अशक्य होते. मात्र नागपुरातील दवाखाने व बेड फुल्ल असल्यामुळे पर्याय नव्हता. अखेरीस डॉ. दर्शना गणवीर यांनी या मुलीला दाखल करून घेतले. वरिष्ठ डॉक्टरांशी दररोज चर्चा करून औषधोपचार सुरू केला. आज कोरोनामुक्त झाली, हिमोग्लोबीनही वाढल्याचे सांगताना रोशनीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
--
वेळीच तपासणी व उपाचार घेतल्यास कोरोनावर मात शक्य आहे. मात्र अनेक रुग्ण तपासणी व उपचारासाठी घाबरतात. सेलोटी व झमकोली येथील दोन रुग्णांचे ऑक्सिजन ७० पर्यंत होते. मात्र सेंटरमध्ये येण्यास ते तयार नव्हते. अखेरीस पोलिसांच्या मदतीने या दोन्ही रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले. आज हे रुग्ण कोरोनामुक्त आहेत.
- अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार भिवापूर