जगदीश जोशी
नागपूर : कोरोनाच्या संक्रमणामुळे आतापर्यंत आठ हजारापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक होती. परंतु आता युवक आणि मध्यम वयोगटातील नागरिकांचा मोठ्या संख्येने मृत्यू होत आहे. रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे शेकडो जणांचा बळी गेला आहे. कुटुंबातील सदस्याचा तडफडत मृत्यू होत असताना पाहणारे नातेवाईक आम्ही काहीच करू शकलो नाही, अशी खंत व्यक्त करीत आहेत.
मागील काही महिने उपराजधानीसाठी खूप त्रासदायक ठरले. संक्रमण आणि त्यामुळे झालेल्या मृत्यूमुळे अनेकांना मानसिक धक्का बसला आहे. असा एकही व्यक्ती नाही ज्याने कुटुंबातील किंवा शेजाऱ्याचा मृत्यू पाहिला नाही. ऑक्सिजन, रेमडेसिविर किंवा एका बेडसाठी भटकंती करावी लागत आहे. बेड न मिळाल्यामुळे अनेकांचा घरीच मृत्यू झाला तर, अनेकांचा रुग्णालयाच्या समोरच जीव गेला. अनेक जण सुखी कुटुंबातील असूनही आपल्या कुटुंबातील सदस्याचा जीव वाचवू शकले नाही. त्यामुळे असे नातेवाईक मानसिक आजाराने ग्रस्त झाले आहेत. कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूसाठी स्व:तला दोषी मानत आहेत. शहरातील मनोविकार तज्ज्ञांच्या हॉस्पिटलमध्येही अशा नागरिकांची गर्दी होत आहे.
मनोविकार तज्ज्ञ डॉ. पवन आडतिया यांनी सांगितले की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची कारणे वेगवेगळी असली तरी असे अनेक कुटुंबीय आहेत जे कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूसाठी स्वत:ला दोषी मानत आहेत. कुटुंबातील सदस्य, मित्राचा मृत्यू झाल्यास त्याला वाचविण्यासाठी आपण काहीच करू शकलो नसल्याची खंत त्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांना झोप न लागणे, घाबरल्यासारखे वाटणे, भूक न लागणे, मनात वाईट विचार येणे, यासारखे आजार होत आहेत. त्यांना आपण काही करू शकलो नसल्याचे वाईट वाटत आहे. डॉ. आडतिया यांनी सांगितले की, दररोज मोठ्या संख्येने अशा तक्रारी घेऊन नागरिक येत आहेत. आगामी काही दिवसात अशा तक्रारी वाढणार आहेत. नागरिकांना बरे होण्यास वेळ लागतो. त्यांच्यावर उपचारासोबतच कुटुंबातील सदस्यांचे प्रेमही औषधासारखे काम करते.
.........
आईच्या मृत्यूसाठी सरिता स्वत:ला मानत आहेत दोषी
सरिताचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले. वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्या आई आणि लहान मुलीसोबत राहतात. सरिता आई, बहिणीची आर्थिक मदत करीत होत्या. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाली. सरिताने सुरुवातीला त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु मोठी रक्कम डिपॉझिट मागितल्यामुळे त्या आईला खासगी रुग्णालयात दाखल करू शकल्या नाहीत. त्यानंतर त्या आईला घेऊन मेयो रुग्णालयात गेल्या. तेथे बेड न मिळाल्यामुळे आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर सरितालाही कोरोनाची लागण झाली. आईच्या मृत्यूचा त्यांच्या मनावर गंभीर परिणाम झाला. त्या स्वत:ला दोषी मानत आहेत. आईची आठवण काढून रडतात. सहा महिन्यापासून त्यांच्यावर मानसिक उपचार सुरू आहेत.
आई-वडिलांच्या मृत्यूची खंत
शासकीय अधिकारी असलेल्या अश्विन यांचे संपूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्त झाले. मधुमेह असल्यामुळे आई-वडिलांच्या प्रकृतीवर अधिक परिणाम झाला. पत्नी, मुलगी आणि स्वत:ला कमी लक्षण असल्यामुळे अश्विनला आई-वडील दोन-चार दिवसात बरे होतील, असे वाटले. परंतु अचानक आई-वडिलांची प्रकृती खराब झाली. त्यांनी आई-वडिलांसाठी बेडचा शोध घेणे सुरू केले. बेड मिळण्यापूर्वीच वडिलांचा मृत्यू झाला. आईसाठी बेड मिळाला. परंतु आईलाही ते वाचवू शकले नाही. याचा त्यांच्या मनावर परिणाम झाला. आई-वडिलांना वेळेवर रुग्णालयात दाखल केले असते तर त्यांचा जीव वाचला असता, अशी खंत त्यांना वाटत आहे.
मैत्रिणीच्या मृत्यूमुळे मानसिक आघात
६० वर्षांच्या नीलिमा यांच्या पतीचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. कुटुंबात मुलगा आणि सुन नोकरीला आहे. ते आपल्या कामात व्यस्त राहतात. नीलिमा यांचा वेळ शेजारच्या मैत्रिणीसोबत गप्पांमध्ये जात होता. त्यांच्या मैत्रिणीच्या पतीचाही काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. दोघींमध्ये सख्ख्या बहिणीसारखे प्रेम होते. चार महिन्यापूर्वी मुलगा आणि सुनेला कोरोनाची लागण झाल्यामुळे नीलिमाला होम क्वारंटाईन व्हावे लागले. त्या आपल्या मैत्रिणीसोबत मोबाईलवर बोलत होत्या. दरम्यान नीलिमाचा मुलगा, सुन बरे झाल्यानंतर त्यांच्या मैत्रिणीलाही कोरोनाची लागण झाली. प्रकृती अधिक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांच्या मैत्रिणीचा मृत्यू झाला. हा धक्का त्या सहन करू शकल्या नाही. त्यांनी मैत्रिणीचे अखेरचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु कुटुंबीयांनी त्यांना मनाई केली. याचा नीलिमाच्या मनावर परिणाम झाला. त्या आपल्या मुलाशी आणि सुनेशी अनोळखी व्यक्तीसारख्या वागत आहेत. मैत्रिणीची आठवण काढून तिच्या जाण्याचे दु:ख व्यक्त करीत बसतात.