‘पब्लिसिटी’त आम्ही होतो ‘झीरो’, भाजपा सरकार मात्र ‘हीरो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 09:32 PM2022-05-05T21:32:48+5:302022-05-05T21:34:43+5:30
Nagpur News स्वत:च्या कार्याची ‘पब्लिसिटी’ करण्यात सरकार व काँग्रेस पक्ष दोघेही ‘झीरो’ होतो व आताचे केंद्रातील भाजपा सरकार त्यात ‘हीरो’ आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय आरोग्यमंत्री आणि राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केले.
नागपूर : केेंद्रात ‘संपुआ’ची सत्ता असताना देशाच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीदेखील करण्यात आली. मात्र, आम्ही प्रचार-प्रसारात मागे पडलो. स्वत:च्या कार्याची ‘पब्लिसिटी’ करण्यात सरकार व काँग्रेस पक्ष दोघेही ‘झीरो’ होतो व आताचे केंद्रातील भाजपा सरकार त्यात ‘हीरो’ आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय आरोग्यमंत्री आणि राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केले. ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस् - २०२१’च्या वितरण सोहळ्यादरम्यान ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
जम्मू-काश्मीरचा मुख्यमंत्री असतानाच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक नकारात्मक बाबी लक्षात आल्या होत्या. विशेषत: ‘एमसीआय’च्या कार्यप्रणालीमुळे अनेक राज्ये हैराण होती. मी केंद्रात गेल्यावर आरोग्यमंत्री पद मागून घेतले व त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील पदभरती, जागेच्या अटीत शिथिलता, प्रवेशक्षमतेत वाढ इत्यादी गोष्टी करवून घेतल्या. यामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. मात्र, ही बाब जनतेपर्यंत आम्ही नेण्यात कमी पडलो, असे त्यांनी सांगितले.
खाजगी क्षेत्रांमध्ये कामाच्या ‘शिफ्ट’ असतात. शासकीय यंत्रणेत असला कुठलाही प्रकार नसतो; परंतु जम्मू-काश्मीरचा मुख्यमंत्री असताना काही प्रकल्प राबविताना मी यंत्रणेला दुहेरी व तिहेरी ‘शिफ्ट’मध्ये काम करायला लावले. त्यामुळे ट्युलिप गार्डन अवघ्या दीड वर्षात बनून तयार झाले. विधान भवन अवघ्या ८ महिन्यांत बांधल्या गेले व यात्री निवासाचे तर भूमीपूजनानंतर तीन महिन्यांत लोकार्पणदेखील झाले. या प्रणालीचा उपयोग करून हज हाऊसदेखील ८ महिन्यांत उभारले. ‘शिफ्ट’ प्रणालीमुळे शासकीय यंत्रणेलादेखील वेगाने काम करता येते व त्यामुळे अनेक कामे नियोजित वेळेच्या अगोदर पूर्ण होऊ शकतात, असे गुलाम नबी आझाद म्हणाले.