नागपूर : आमचा मराठा आरक्षणाला विरोध नसून केवळ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही मागणी कायम आहे. सरकारचं आणि जरांगे पाटील यांचे काय ठरले ते अधिवेशनात विचारू. तुमचं गुपचूप काय ठरलं, आतून ठरलं की बाहेरून ठरलं, ते विचारू असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी नागपुरात दिला.
वडेट्टीवार म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शेतकऱ्यांच्या वेदना जाणवायला या सरकारला वेळच नाही. सत्तेचा मलिदा खाण्यात हे सरकार व्यस्त आहे. राज्याला दुष्काळ घोषित करण्याची मागणी करत होतो. पण एसडीआरएफ आणि एनडीआरएफची निकषानुसार केंद्र सरकार मदत करते त्या विभागाची बैठकसुद्धा मंत्र्यांनी घेतली नाही. केवढं तोंड बघून ४० तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला. नंतर घोषित झाल्या एक हजार मंडळांना केंद्र सरकार मदत करू शकत नाही. राज्य सरकारने हात वर केलेले आहे. या स्थितीत शेतकरी जगणार कसा, असा सवाल त्यांनी केला.
मराठवाड्यात धरणात पाण्याचा साठा केवळ ३६ टक्के शिल्लक आहे. अजून सात महिने काढायचे आहेत. पिण्याचे पाणी नाही, शेती पिकत नाही. या स्थितीत शेतकऱ्यांनी किडनी विकायची वेळ आली. सरकारने या राज्यातील शेतकरी कर्जमुक्त केला पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.