नागपूर : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आडनावावरून इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरू होते. आता त्यात सुधारणा केल्या जाणार असून, आडनाव घेताना जात व प्रवर्गाचीही संबंधित ग्रामपंचायतीकडून तपासणी केली जाईल. पुढील १० दिवसांत इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर हा डाटा न्यायालयात सादर केला जाईल, अशी माहिती ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
वडेट्टीवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासंदर्भात जे प्रश्न उपस्थित केले ते काही अंशी खरे आहेत. राज्य सरकारला याची कल्पना होती. आडनावावरून सॅम्पल सर्व्हे केला तर त्यातून ओबीसीचे नुकसान होऊ शकते. त्यानुसार सुधारणा करण्यात आली आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. राज्यात २० लाख कर्मचारी आहेत, त्यांच्या मदतीने डाटा गोळा होत आहे. ओबीसींचे कोणतेही नुकसान सहन केले जाणार नाही व होऊ दिले जाणार नाही. अधिसूचना निघाली असली तरी निवडणुका कोर्टाच्या आदेशाने होईल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेत मदतीसाठी शिवसेनेशी चर्चा करणार
- संख्याबळानुसार शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून येतील. काँग्रेसला दुसरी जागा निवडून आणण्यासाठी ९ मतांची गरज आहे. सर्व मिळून लढलो तर ते शक्य होईल. याबाबत शिवसेनेसोबत चर्चा केली जाईल. विधान परिषद निवडणुकीत सर्व अपक्ष महाविकास आघाडीसोबत राहतील, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.
पहिल्या पसंतीची १६२ मते, सरकार स्थिर
- राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पहिल्या पसंतीची १६२ मते मिळाली. त्यामुळे सरकार स्थिर आहे हे दिसून येते. या निवडणुकीत आमचे नियोजन चुकले. विधान परिषद निवडणुकीत आम्ही ताकपण फुंकून पिऊ, असेही ते म्हणाले. चावाचावीचे राजकारण करण्यापेक्षा हस्तांदोलनाचे राजकारण करून महाराष्ट्राला प्रगतिपथावर न्यावे लागेल. स्थिर सरकार असेल तर विकासाला गती मिळते, सरकारला अस्थिर करत असेल तर महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसेल, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.