लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बहुचर्चित उषा कांबळे आणि राशी कांबळे दुहेरी हत्याकांडाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी आपण व्यक्तिगत त्यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकारांना दिले.महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ पत्रकार सरिता कौशिक, नरेश डोंगरे, अविनाश महाजन आणि या दुहेरी हत्याकांडचे पीडित पत्रकार रविकांत कांबळे आदींच्या शिष्टमंडळाने शनिवारी रामगिरी येथेमुख्यमंत्र्यांची भेट घेतली.नागपुरात १७ फेब्रुवारीला घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाची व आतापर्यंतच्या घडामोडींची माहिती पत्रकारांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. या घटनेमुळे केवळ नागपूरच नव्हे तर राज्यभरात थरार निर्माण केला आहे. आरोपींनी ५४ वर्षीय उषा कांबळे यांच्यासोबतच दीड वर्षीय चिमुकली राशी कांबळे हिचीदेखील निर्घृण हत्या केली आणि या दोघांचेही मृतदेह नाल्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून पुढे आली आहे. या हत्याकांडाच्या संबंधाने निर्माण झालेली जनभावना पत्रकारांनी आज मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी तसेच या दुहेरी हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी यावेळी पत्रकारांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासंदर्भात आपण पूर्ण प्रयत्न करू. आपण स्वत: अॅड. उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा करणार असून, हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. पत्रकारांनी या प्रकरणात एका तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. त्याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. अधिकाºयाने काही चूक केली असेल तर त्याच्यावरही कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
कांबळे हत्याकांड खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:02 PM
बहुचर्चित उषा कांबळे आणि राशी कांबळे दुहेरी हत्याकांडाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी आपण व्यक्तिगत त्यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकारांना दिले.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे आश्वासन : पत्रकारांचे शिष्टमंडळ भेटले