रमाई घरकूल योजनेचा ४० कोटींचा निधी अप्राप्त : १७८५ लाभार्थ्यांची पायपीट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध समाज घटकांच्या घरकूल बांधणीसाठी राबविण्यात येत असलेल्या रमाई आवास योजनेचा निधी राज्य सरकारकडून अप्राप्त असून २०१७ दुर्बल घटकातील १७८५ लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे मागील चार वर्षात बांधकाम साहित्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने मंजूर अनुदानात घरकुलाचे बांधकाम करणे अवघड आहे. अशा परिस्थितीत दुर्बल घटकातील लाभार्थींचे घराचे स्वप्न कधी पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
समाजकल्याण विभागातर्फे ४,७३७ लाभार्थींची यादी महापालिकेस रमाई आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी पाठविण्यात आली होती. या यादीचे मनपाने सर्वेक्षण केले असता ३,०४९ लाभार्थी आढळून आले. रमाई आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात १,१९६ तर दुसऱ्या टप्प्यात १,८६८ असे एकूण ३,०४९ लाभार्थी मंजूर आहेत. मनपाला या योजनेसाठी ४१ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. तर जवळपास ४० कोटीचा निधी मिळालेला नाही. प्राप्त निधीतून काहींना पहिला व दुसरा हप्ता मिळाला तर तिसरा मिळाला नाही. अनेक लाभार्थी चार वर्षांपासून घराची प्रतीक्षा करीत आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील ९६८ लाभार्थींना फेब्रुवारी-२०२० मध्ये पहिला हप्ता देण्यात आला. तर त्यातील ६२५ जणांना सप्टेंबर २०२० मध्ये दुसरा हप्ता देण्यात आला. तर १५८ लाभार्थींना तिसरा हप्ता ऑक्टोबर २०२० मध्ये देण्यात आला. उर्वरित लाभार्थींचे अनुदानाचे हप्ते थकल्याने त्यांच्या घरांचे काम रखडले. लाभार्थी कुटुंबास २ लाख ५० हजाराचे अनुदान तीन हप्त्यांमध्ये महापालिकेतर्फे दिले जाते. पहिला व दुसरा हप्ता प्रत्येकी १ लाख तर तिसरा हप्ता ५० हजाराचा देण्याची तरतूद आहे.
...
१,७१० घरांचे बांधकाम अर्धवट
महानगरपालिकेच्या काही झोनमधील या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रगतीचा आढावा घेतला असता १,८६८ लाभार्थींपैकी ९६८ लाभार्थींना पहिला हप्ता तर ६२५ लाभार्थींना दुसरा हप्ता मिळाला. तिसरा हप्ता जेमतेम १५८ लाभार्थींना मिळाला. म्हणजेच १,७१० लाभार्थींच्या घरांचे बांधकाम अर्धवट आहे. शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक यांनी महापालिका व समाजकल्याण विभागाला अनेकदा निवेदने दिली. परंतु लाभार्थींना लाभ मिळालेला नाही.
....
दुर्बल घटकांना न्याय कसा मिळणार?
राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध समाज घटकांच्या घरकूल बांधणीसाठी योजना राबविण्यात येते. परंतु निवड झालेल्या लाभार्थींना अनुदान वेळेवर मिळत नाही. दुर्बल घटकांना न्याय मिळण्यासाठी महापालिका व समाजकल्याण विभागाने यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा.
-तानाजी वनवे, विरोधी पक्ष नेते, मनपा
.........
दुसऱ्या टप्प्यातील झोन निहाय स्थिती
झोन मंजूर लाभार्थी पहिला हप्ता जारी दुसरा हप्ता जारी तिसरा हप्ता जारी उर्वरित लाभार्थी
लक्ष्मीनगर २४८ ११२ २९ .. १३६
धरमपेठ १६० ४० १८ १ १२०
हनुमाननगर ७५ ५१ ४० ४ २४
धंतोली ८२ ७२ ६२ ६ १०
नेहरुनगर १३८ ६२ २६ ३ ७५
गांधीबाग ४५ १६ ४ .. २७
सतरंजीपुरा ८७ ३८ १८ .. ४९
लकडगंज १८५ १२८ ७० ४ ५४
आशिनगर ७४३ ४१४ ३३२ १३८ ३३०
मंगळवारी १०५ ३५ २९ २ ७१
एकूण १८६८ ९६८ ६२५ १५८ ८९६