लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने वाहतुकीचे नियम अतिशय कडक केले आहेत. दंडाच्या शुल्कात वाढ केली आहे. यावरून सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. महिनाभरापूर्वी शहरातून निघालेल्या महाजनादेश यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले होते. त्यावरून प्रसार माध्यमांनी सरकारला चांगलेच फटकारले होते. निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही, त्यावरून आपल्याला गालबोट लागणार नाही, या भीतीपोटी उमेदवारांनी कार्यकर्त्यांना रॅलीत येताना हेल्मेट आणावे, असे आवाहन केले आहे.राजकीय पक्षांच्या उमेदवारी घोषित झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरताना आपली शक्ती दाखविण्यासाठी उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांना रॅलीत सहभागी होण्यास आमंत्रण देत आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट शेअर केल्या जात आहेत. या पोस्टमध्ये विशेष टीप ही हेल्मेटसाठी दिली आहे. रॅलीत येणाऱ्या प्रत्येक दुचाकी चालक कार्यकर्त्याने हेल्मेट आणावे, असे स्पष्ट बजावले आहे. शुक्रवार हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. शहरातील सहाही विधानसभेत भाजपाचे उमेदवार अर्ज भरणार आहेत. काँग्रेसचे चार उमेदवार शेवटच्या दिवशी अर्ज भरणार आहेत. संविधान चौकात भव्य शक्तिप्रदर्शन होणार आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागातून उमेदवारांच्या स्कूटर, कार रॅली निघणार आहे. नेताच सोबत असल्याने रॅलीदरम्यान कार्यकर्ते वाहतुकीच्या नियमांना मोजत नाहीत. पण यावेळी नेत्यांनीच सावध पवित्रा घेतला आहे. निवडणुकीदरम्यान आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी, कायद्याच्या कुठल्याही कचाट्यात न सापडण्यासाठी हेल्मेट सक्तीचे आवाहन केले आहे.भाजपाला नियमांची धास्ती, काँग्रेस बिनधास्तकाँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांनी रॅलीत सहभागी होण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केले आहे. भाजप उमेदवारांनी केलेल्या पोस्टमध्ये रॅलीत हेल्मेट वापरावे अशी स्पष्ट टीप दिली आहे. यावरून भाजप उमेदवारांना नियमांची धास्ती असल्याचे दिसते आहे. काँग्रेसच्या उमेदवारांनी फक्त रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार वाहतुकीच्या नियमांबाबत बिनधास्त असल्याचे दिसत आहे.
हेल्मेट घालूनच रॅलीत या!उमेदवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 10:59 PM
निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही, त्यावरून आपल्याला गालबोट लागणार नाही, या भीतीपोटी उमेदवारांनी कार्यकर्त्यांना रॅलीत येताना हेल्मेट आणावे, असे आवाहन केले आहे.
ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन नकोच