नागपूर : दाेन दिवस ढगाळ वातावरणानंतर रविवारी तापमानाने पुन्हा उसळी घेतली. विदर्भ पुन्हा भाजायला लागला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ४२.३ अंश तापमान अकाेल्यात हाेते. दुसरीकडे मराठवाड्याचे जिल्हेही तापायला लागले आहेत. मुंबई, काेकण क्षेत्रात कमाल तापमानात काहीशी घट झाली, पण पुणे क्षेत्राचा ताप वाढायला लागला आहे.
विदर्भातील नागपूरसह काही जिल्ह्यांत दाेन दिवस ढगाळ वातावरण हाेते. रविवारी मात्र हवामान बदलले आणि सूर्याचा प्रकाेप जाणवला. नेहमीप्रमाणे मार्च एन्डिंगला पाऱ्याने उसळी घेतली. अकाेल्याने उच्चांकी गाठली. इकडे नागपूरला ४०.२ अंश तापमानाची नाेंद झाली. अमरावती ४१.४ अंश, चंद्रपूर ४१.८ अंश तर वाशिमला ४१ अंशावर ताप वाढला. गाेंदिया, वर्धा ४० अंशावर पाेहोचले तर गडचिराेली, बुलडाणामध्ये अनुक्रमे ३९ व ३९.८ अंशाची नाेंद झाली.
मराठवाड्यात परभणीत सर्वाधिक ४१.२ अंश तापमानाची नाेंद झाली. औरंगाबादलाही ताप ३९.६ अंशावर पाेहोचला. पुणे विभागात पुणे ३९.६ अंश तर साेलापूर सर्वाधिक ४०.२ अंश हाेते. सातारा, नाशिक, काेल्हापूरलाही तापमान काही अंशाने वाढून ३७, ३८ अंशाच्या सरासरीवर पाेहोचले हाेते. मुंबई व काेकण प्रदेशात सूर्याने काहीसा दिलासा दिला. दाेनच दिवसांपूर्वी मुंबईचे तापमान ३९ अंशावर गेले हाेते, पण रविवारी घसरण हाेत ३३.४ अंश कमाल तापमानाची नाेंद करण्यात आली. रत्नागिरी ३२.६ अंश तर गाेव्याचे पणजी ३२.४ अंशावर हाेते.
विदर्भ, मराठवाड्यात हीट वेव्हज
येते काही दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यासाठी तापदायक ठरणारे आहेत. विदर्भात पुढचे तीन दिवस उष्ण लहरींचा धाेका हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दुसरीकडे मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात २९ ते ३१ मार्चपर्यंत उष्ण लहरींचा धाेका आहे. पश्चिम हिमालय रिजन व गुजरात राज्यात निर्माण झालेल्या उष्ण लहरींचा प्रभाव महाराष्ट्रातील काही भागांवर पडणार आहे.