नागपूर: शहरात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावासाचा जोर आज आणि उद्यादेखील कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे नागपूरमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे काल शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. याशिवाय काही भागांमधील वीजपुरवठादेखील खंडित झाला. त्यामुळे लोकांचे मोठे हाल झाले. मुसळधार पावसाचा फटका विधीमंडळाच्या कामाकाजालादेखील बसला. विधीमंडळाचा वीजपुरवठा खंडित झाल्यानं काल कामकाज होऊ शकलं नाही. हवामान खात्यानं पुढील 48 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज शहरातील शाळा आणि महाविद्यालयं बंद राहतील. नागपूर महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे नागपूरातील पूर परिस्थितीवरुन विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. मुंबई का तुंबली, असा प्रश्न विचारणारे आता कुठे गेले?, अशा शब्दांमध्ये मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही मुख्यमंत्र्यांसह भाजपा नेत्यांना लक्ष्य केलं.
नागपुरात आज, उद्या मुसळधार पावसाची शक्यता; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 7:51 AM