लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गाेंदिया शहर वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाचा जाेर मंदावल्याचे चित्र दिसले. मात्र पावसाळी वातावरण कायम असून पुढचे दाेन-तीन दिवस कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी काेसळतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान शनिवारी सकाळपर्यंत गाेंदिया शहरात सर्वाधिक १२० मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. नागपूर विभागाचे सहा जिल्हे मिळून दिवसभरात ६.९ मिमी पाऊस नाेंदविला गेला. दरम्यान यावर्षी २४ जुलैपर्यंत झालेला पाऊस सामान्यपेक्षा ११० टक्के असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ताे १७ टक्के अधिक आहे.
नागपूरसह इतर जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने थाेडी उसंत घेतली. मात्र काही वेळाच्या अंतराने रिमझिम चालत हाेती. नागपुरात शुक्रवारी सायंकाळी सूर्यदर्शन घडले पण शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण कायम हाेते. जिल्ह्यात एकूण ९.४ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. शुक्रवारपर्यंत रेड अलर्टवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातही शनिवारी पावसाचा जाेर काहीसा ओसरल्याचे दिसून आले. शुक्रवारी जिल्ह्यात ११७ मिमीपर्यंत पावसाची नाेंद झाली हाेती तर काही तालुक्यात २०० मिमीचा पल्ला गाठला हाेता. शनिवारी मात्र केवळ ९.७ मिमी पाऊस नाेंदविला गेला. गाेंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १४.८ मिमी पाऊस नाेंदविला गेला. याशिवाय वर्धा १.२ मिमी, भंडारा ३.४ मिमी तर गडचिराेली ०.८ मिमीची नाेंद झाली. पश्चिम विदर्भात अकाेल्यात सर्वाधिक ३२.६ मिमी पावसाची नाेंद झाली. नागपूरचे तापमान १.६ अंशाच्या वाढीसह २९ अंश नाेंदविले गेले. आर्द्रता ८८ टक्के हाेती. अकाेल्याचे १.९ तर अमरावतीचे तापमान ३.३ अंशाने घटले. दाेन्ही जिल्ह्यात २९.८ व २७ अंश तापमान नाेंदविले गेले. यवतमाळमध्येही तापमान २.६ अंशाने घटले.
नागपूर विभागात जून ते सध्याच्या कालावधीपर्यंत सरासरी ४६७.६ मिमी पावसाची नाेंद केली जाते. मागील वर्षी ती ४३६ मिमी एवढी हाेती. यावर्षी २४ जुलैपर्यंत ५१७.९ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली, जी सामान्यच्या तुलनेत ११०.७६ टक्के अधिक असल्याचे दिसते. गेल्या वर्षीच्या तुलनेत ती १७ टक्के अधिक आहे.