लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : लग्न समारंभासाठी केवळ २५ जणांची परवानगी असतानाही उमरेड- कऱ्हांडला-पवनी अभयारण्यालगत असलेल्या काही रिसाेर्टवर अजूनही लग्न समारंभाचा धडाका सुरूच असल्याची विश्वसनीय माहिती आहे. परिसरात डझनभर रिसाेर्ट असून, शहराच्या बाहेर हा परिसर येतो. यामुळे जिल्हा सीमावर्ती भागातील लग्नसमारंभ लपूनछपून उरकले जात आहेत.
नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या भागातूनही रिसाेर्टवर हा कार्यक्रम होत असून, तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने या गंभीर विषयाकडे जाणीवेने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर केवळ लग्न समारंभ, तेरवी, राजकीय कार्यक्रम यामुळेच कोरोनाचे प्रमाण वाढले. कोरोनाचे हे संकट आता मोठ्या शहरातून गावखेड्यात पोहोचले आहे. ग्रामीण भागात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. अशावेळी लग्न समारंभात शेकडो नागरिकांची उपस्थिती कोरोनाला निमंत्रण देणारीच ठरणार आहे. त्यामुळे कोणत्याही नियमावलीचा भंग न करता अधिकाऱ्यांनी नियोजन आखावे, अशी मागणी व्यक्त होत आहे.