लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शनिवार व रविवार हे दोन दिवस स्पर्धा परीक्षांचे राहणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा शनिवारी आयोजित करण्यात आली आहे. तर रविवारी युपीएससीकडून भविष्य निधी संघटना, श्रम आणि रोजगार मंत्रालयामधील विविध पदांसाठी परीक्षा होणार आहे. दोन्ही मिळून ४० हजार परीक्षार्थी राहणार आहेत. एमपीएससीतर्फे एप्रिल २०२० मध्ये गट-ब संयुक्त परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, कोरोनामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली. त्यानंतरही तीनदा तारखा जाहीर होऊनही परीक्षा झाली नाही.
नागपुरातील ३८ केंद्रांवरून १२ हजार ५६५ उमेदवार एमपीएससीची परीक्षा देणार आहेत. तर, ८२ केंद्रांवर २८ हजार ४०३ उमेदवार युपीएससी परीक्षा देतील. कोरोनाच्या नियमांचे पालन करून दोन्ही परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. बैठक व्यवस्थाही शारीरिक अंतर लक्षात घेऊन केली जाणार आहे.
दरम्यान, परीक्षेसाठी विदर्भातील उमेदवार शहरात येतील. त्यामुळे बस व रेल्वेस्थानकावर गर्दी होऊ शकते.