इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजननागपूर : लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने सुरेल गीतांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सकाळी संघटनेचे सदस्य असलेले वैद्यकीय अधिकारी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. भावगीत, भक्तीगीत आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या गीतांनी डॉक्टर्स मंडळींनी दीपावलीचे सुरेल स्वरांनी स्वागत केले. कार्यक्रमात आविष्कार कला अकादमीच्या कलावंतांनी एकापेक्षा एक सरस गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांना जिंकले. या कार्यक्रमाची संकल्पना व संगीत नियोजन अकादमीचे संचालक व सारेगमप स्पर्धेचे विजेते महागायक अनिरुद्ध जोशी यांची होती. कार्यक्रमात अनिरुद्ध जोशी, यशश्री भावे - पाठक, सोनाली दीक्षित आणि शशी वैद्य या गायकांनी तयारीने गीतांचे सादरीकरण करून वातावरणनिर्मिती साधली. यावेळी लोकप्रिय हिंदी आणि मराठी गीतांचे सादरीकरण करण्यात आले. सर्वच गीतांना उपस्थितांनी मनमोकळी दाद दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी डॉ. प्रदीप राजदेरकर आणि डॉ. गौरी अरोरा यांनी परिश्रम घेतले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. सचिव डॉ. कुश झुनझुनवाला यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. अशोक अढाऊ, डॉ. मिलिंद नाईक, उपाध्यक्ष डॉ. किशोर टावरी, डॉ. वाय. एस. देशपांडे, डॉ. बी. के. शर्मा, डॉ. डी. एन. अग्रवाल, डॉ. एस. एल. शिवहरे, डॉ. अजय काटे, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. राफत खान, डॉ. दिलीप अर्जुन आणि डॉ. सरिता उगेमुगे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांना फराळ वितरित करण्यात आला. (प्रतिनिधी)
दिवाळीचे सुरेल स्वागत
By admin | Published: October 26, 2014 12:16 AM