लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय सैन्याने नेहमीच देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले आहे. सैन्यामुळे आपण सुखाने जीवन जगू शकतो. त्यामुळे सामान्य जीवन जगताना प्रत्येकाने सैन्याप्रमाणे देशाचे हित समोर ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उप विभागाचे मेजर जनरल राजेश कुंद्रा यांनी केले.भोसला मिलिटरी स्कूलच्यावतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कारगिल विजय दिनाच्या समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर सेंट्रल हिंदू मिल्ट्री एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सूर्यरतन डागा, सचिव कुमार काळे, भोसला मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर, कमांडंट कर्नल जे. एस. भंडारी, अजय शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. मेजर जनरल राजेश कुंद्रा म्हणाले, चारित्र्यावर आर्मीत भर देण्यात येतो. विश्वासाची शक्ती, चेतनेची शक्ती, भीतीची शक्ती आणि ऊर्जेची शक्ती या चार बाबींमुळे आर्मी इतरांपेक्षा वेगळी ठरते. आर्मीतील जवान जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन सर्वांना एकत्र ठेवण्याचे काम करतात. नाम, नमक आणि निशाणसाठी ते प्राणपणाने लढत असल्याचे त्यांनी सांगितले. कर्नल जे. एस. भंडारी यांनी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन येथे विद्यार्थ्यांसाठी सर्व सोईसुविधा उपलब्ध असल्यामुळे ही मध्य भारतातील सर्वात मोठी मिलिटरी स्कूल ठरल्याचे सांगितले. संस्थेचे सचिव कुमार काळे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कारगिलच्या लढाईत विजय मिळवून देणाºया शूर जवानांना आदरांजली अर्पण केली. आभार शैलेश जोगळेकर यांनी मानले. यावेळी मेजर जनरल राजेश कुंद्रा यांना कुमार काळे यांनी स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. समारंभापूर्वी मेजर जनरल राजेश कुंद्रा यांनी अमर जवान स्मारकाला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. रामनगर येथून पथसंचलन करण्यात आले. लक्ष्मीभुवन आणि रविनगर या दोन मार्गाने निघालेले भोसला मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी लॉ कॉलेज चौकात एकत्र आले. तेथून ते वसंतराव देशपांडे सभागृहात पोहोचले.