नागपूर : इंडिया ओपन २०२२ बॅडमिंटन स्पर्धेत जगज्जेती सायना नेहवाल हिला तिसऱ्या फेरीत पराभूत करून विक्रम प्रस्थापित करणारी नागपूरची मालविका बनसोड गुरुवारी दिवसभर नागपूरकरांच्या ओठी होती. स्पर्धेच्या मैदानावर तिने संपादन केलेले यश केवळ नागपूरकरांसाठीच नव्हे तर देशासाठीही कौतुकास्पद असल्याने नागपूरकरांच्या आनंदाला आज उधाण आलेले होते.
तिच्या यशाची वार्ता दूरचित्रवाहिन्यांवरून कळताच नागपूरकरांमध्ये एकच आनंदाची लहर उसळली. क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी पेढे आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. फेसबूक, व्हाॅट्सअॅप, ट्विटर, इन्टाग्रामवरून तिच्यावर शुभेच्छांची सुरू झालेली उधळण सायंकाळनंतरही सुरू होती. अनेक व्हाॅट्सअॅप ग्रुपवरूनही तिच्या कामगिरीचे कौतुक सुरू होते.
‘नागपूर की बेटी, नागपूरची शान’ अशा विशेषणांनी नागपूरकरांनी तिचा गौरव केला. नागपूरला प्रथमच बॅडमिंटनमध्ये लौकिक मिळवून देणारी मालविका स्पर्धेमुळे नागपूरबाहेर असल्याने प्रत्यक्ष भेटून चाहत्यांना तिचे अभिनंदन करता आले नाही. स्पर्धेतील तिची कामगिरी पाहण्यासाठी आईवडीलही शहराबाहेर आहेत. मात्र अनेकांनी तिच्याशी आणि आईवडिलांशी मोबाईलवरून संपर्क साधून मालविकावर अभिनंदनाचा वर्षाव केला. नागपूरचे नाव देशात उंचावल्याबद्दल अनेकांच्या मनात तिच्याबद्दल अभिमान असलेला जाणवला. शहरातील क्रीडा मैदानांवरही तिच्या विजयाचा जल्लोष व्यक्त झाला.