नागपूर : हायटेंशन लाईनमध्ये अडकलेला पतंग काढण्याच्या प्रयत्नात कामगार युवकाचा मृत्यू झाला. ही घटना कळमनाच्या विजयनगरात घडली आहे.
तुलेश जयलाल साहु (२४) असे मृत युवकाचे नाव आहे. तुलेश वॉटर प्रुफींगचे काम करीत होता. त्याच्या कुटुंबात आईवडिल, पत्नी आणि तीन विवाहित बहिणी आहेत. तुलेशचे महिनाभरापूर्वी नताशासोबत लग्न झाले होते. तुलेश चार दिवसांपूर्वी आपल्या गावी गेला होता. आज दुपारी ४ वाजता तो गावावरून परतला. सायंकाळी ५ वाजता तो आपल्या घराच्या गच्चीवर उभा होता. त्यावेळी त्याची नजर घराच्या छतावरून गेलेल्या हायटेंशन लाईनमध्ये अडकलेल्या पतंगावर गेली. तुलेशने पतंग काढण्यासाठी पडद्याचा पाईप काढला. पाईपच्या मदतीने तो पतंग काढत होता. पाईप हायटेंशन लाईनला लागल्यामुळे तुलेशला वीजेचा धक्का लागला. तो जमिनीवर पडून बेशुद्ध झाला.
नगरसेवक पुरुषोत्तम हजारे, सामाजिक कार्यकर्ता रामदास साहु, दिनेश फटींग त्वरीत घटनास्थळी पोहोचले. तुलेशला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. तुलेशचे १४ डिसेंबरला लग्न झाले होते. एकुलता एक मुलगा असल्यामुळे आईवडिलांनी धुमधडाक्यात त्याचे लग्न केले होते. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यावर तुलेश गावावरून परत आला होता. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. विजयनगर परिसरातील नागरिक त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करीत आहेत. कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दोघांनी गमविला जीव
पतंग काढण्याच्या आणि पकडण्याच्या प्रयत्नात काही दिवसात कोराडी आणि पारडीत दोन बालकांचा विहिरीत तसेच नाल्यात पडून मृत्यु झाला आहे. दरवर्षी मकरसंक्रातीला अशा घटना घडतात. या घटना रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येऊनही पतंगाच्या नादात अनेकजण आपला जीव धोक्यात घालत असल्याची स्थिती आहे.
.................