नागपूर : भरधाव ट्रकच्या धडकेत एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. प्रथमेश मोहन बुरबांदे (१६, आदर्शनगर, रनाळा) असे मृताचे नाव आहे.
बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास तो त्याच्या दुचाकीने मित्राला भेटायला येरखेडा येथे गेला होता. तेथून परत येत असताना कळमना मार्गावरील खुशबू मोटर्ससमोर पाठीमागून येणाऱ्या एमपी २८ एच ३७६३ या क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक मारली. त्यात प्रथमेश खाली पडला व त्याच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी एका खासगी इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मनोज बुरबांदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रकचालक विनोबा रामेश्वर राऊत (३८, उमरानाला, छिंदवाडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.