लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (हिंगणा) : जनावरांसाठी पाणी आणायला नदीवर गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. सोनू ऊर्फ तुषार ब्रिजकिशोर जबलपुरे (१६) रा. जबलपुरे ले-आऊट,मानेवाडा,नागपूर असे मृत मुलाचे नाव आहे. हिंगणा तालुक्यातील पेवठा शिवारात मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.तुषारचे काका चंद्रशेखर जबलपुरे यांचा दुधाचा व्यवसाय आहे. पेवठा शिवारात त्यांचा जनावराचा गोठा आहे. मंगळवारी सकाळी ते घरून गोठ्याकडे जाण्यासाठी निघाले, तेंव्हा त्यांचा मुलगा सुजल व पुतण्या तुषार सुद्धा त्यांच्यासोबत मानेवाडा येथून निघाले. काही वेळाने सुजल व तुषार हे दोन्ही भाऊ पेवठा येथील गोठ्यामागे असलेल्या नदीवर पाणी आणायला गेले. पाण्याची पहिली खेप एकत्र आणल्यानंतर दुसऱ्या वेळी तुषार एकटाच नदीवर गेला. बराच वेळ होऊन तो परत न आल्याने काका चंद्रशेखर व सुजल यांनी नदीकडे जाऊन बघितले तेव्हा त्यांना नदीच्या काठावर तुषारच्या चपला दिसल्या पण तो आढळला नाही. लागलीच याची सूचना त्यांनी हिंगणा पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. बराच वेळ शोध घेतल्यानंतर दुपारी दोन वाजता त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. हिंगण्याच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. ठाणेदार सारीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात हवालदार विनोद देशमुख पुढील तपास करीत आहेत.