नागपूर : आपल्या देशाच्या सनातन संस्कृतीमध्ये ज्ञानसमृद्धता होती. परंतु इंग्रज येण्याअगोदर आपण रानटी होतो व त्यांच्यामुळे आधुनिकतेची ओळख झाली, असा काही जणांनी अपप्रचार केला. याच विचारातून स्वातंत्र्यानंतरच्या २०-२५ वर्षांमध्ये देशाने आत्महीनतेचा कालखंड अनुभवला व अनेक धोरणांमध्ये त्याचे प्रतिबिंब दिसते. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाश्चिमात्य नव्हे तर सनातन विचारांचीच आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. पं. दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी निमित्ताने भारतीय विचार मंच, नागपूरच्यावतीने लेखक व विचारवंत डॉ. कुमार शास्त्री यांनी लिहिलेल्या ‘कारुण्य ऋषी : पं. दीनदयाल उपाध्याय’ या पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन झाले यावेळी ते बोलत होते.शंकरनगरातील साई सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ संघ विचारवंत मा.गो. वैद्य, लेखिका आशा बगे, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी प्रामुख्याने उपस्थित होते. देशाला सनातन समग्र विचारांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. महात्मा गांधींच्या विचारांचे मूळदेखील त्यातच होते. जनतेच्या वर्तमानातील अपेक्षा लक्षात घेऊन भविष्यकाळाचे आश्वासक चित्र उभे करण्याची शक्ती एकात्म मानव दर्शनात आहे. या मानव दर्शनालादेखील सनातन दृष्टी आहे. आज समाजात नागरिक सुखाचा शोध घेत आहेत. परंतु पैसे कमविण्याच्या नादात सुख व समाधान हरविले आहे. पौर्वात्य किंवा पाश्चिमात्य यापैकी एकाही पद्धतीमागे एकदम धावणे अयोग्य आहे, असे डॉ. भागवत म्हणाले. यावेळी आशा बगे, गिरीश गांधी यांनीदेखील विचार व्यक्त केले. डॉ. कुमार शास्त्री यांनी या पुस्तकासंदर्भातील आपली भूमिका मांडली तर भारतीय विचार मंचाचे नागपूर संयोजक उमेश अंधारे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला महापौर प्रवीण दटके, आ. अनिल सोले, आ. नागो गाणार, महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे उपस्थित होते.(प्रतिनिधी)धर्म की पंथ निरपेक्षता हा वाद अकारण४देशात अनेकदा वाद होतो की धर्मनिरपेक्षता हवी पंथनिरपेक्षता; परंतु मुळात हा वादच अकारण आहे. धर्म हा केवळ पूजापद्धती नसून ती जीवनपद्धती आहे. साधे साधे नियम पाळणे हा देखील एकप्रकारचा धर्मच आहे, असे प्रतिपादन डॉ. भागवत यांनी केले. यावेळी त्यांनी पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांवर विविध उदाहरणातून प्रकाश टाकला.आरक्षणावर नव्याने चर्चा हवीच४सरसंघचालकांनी आरक्षणाच्या फेरविचारासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर बराच वाद झाला होता. ज्येष्ठ संघ विचारक मा.गो.वैद्य यांनी याच मुद्याला हात घालत आरक्षणावर नवीन चर्चा होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. पं.दीनदयाल उपाध्याय यांनी अंत्योदय म्हणजेच समाजातील अखेरच्या माणसाच्या कल्याणाचे सूत्र मांडले. वंचितांसाठीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण लागू केले होते. हे आरक्षण १० वर्षांसाठीच हवे असे त्यांचे मत होते. परंतु ते राजकारणामुळे अद्यापही सुरू आहे. परंतु मुळात आरक्षणाचा लाभ गरजूंना होत आहे का याची समीक्षा करण्याची गरज निर्माण झाली आहे. दोन पिढ्यांपासून आरक्षणाचा लाभ मिळत असलेल्यांना खरोखर आरक्षणाची आवश्यकता आहे का, असा प्रश्न उपस्थित करत मा.गो.वैद्य यांनी अंत्योदयापर्यंत आरक्षण गेले पाहिजे असे प्रतिपादन केले. मा.गो.वैद्य यांच्या या भूमिकेमुळे नवीन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
पाश्चिमात्य नव्हे, सनातन विचारांची देशाला गरज
By admin | Published: January 19, 2016 4:12 AM