हायकोर्टाची शासनाला विचारणा : ५ एप्रिलपर्यंत मागितले उत्तर नागपूर : काशीनगर (रामेश्वरी रोड) येथील वंदना व अतुल वैद्य यांच्या हत्येच्या तपासात झालेल्या गैरप्रकाराच्या चौकशीचा असमाधानकारक अहवाल सादर केल्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा व प्रकरणाच्या तपासात निष्काळजी केल्यामुळे तपास अधिकारी दिलीप घुगे (सहायक पोलीस निरीक्षक, अजनी) यांच्यावर काय कारवाई करता येऊ शकते, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनास करून यावर ५ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रकरणाचा तपास कायद्यानुसार होत नसल्याची बाब लक्षात घेता न्यायालयाने याची चौकशी करण्याचा व १४ मार्चपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश शासनाला दिला होता. त्यानुसार रंजनकुमार शर्मा यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शर्मा यांनी प्रकरणाची चौकशी करून १० मार्च रोजी अहवाल सादर केला. न्यायालयाने या अहवालावर असमाधान व्यक्त करून शासनाला फटकारले व वरीलप्रमाणे निर्देश दिलेत. १२ आॅगस्ट २०१६ पासून वैद्य दाम्पत्य अचानक बेपत्ता झाल्यानंतर गौतम खडतकर व सिंधू झिलपे यांनी न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. वंदना वैद्य या त्यांच्या भगिनी होत्या. अतुल वैद्य यांचा त्यांच्या वडिलोपार्जित घराबाबत बिल्डर किरण महल्लेसोबत वाद सुरू होता. याचिकाकर्त्यांनी महल्लेवर संशय व्यक्त केला होता. न्यायालयाच्या दणक्यानंतर पोलीस हरकतीत आले व त्यांनी पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर किरण महल्ले फुटला. महल्ले व अन्य आरोपींनी वैद्य दाम्पत्याची त्यांच्याच घरी निर्घृण हत्या करून त्यांचे मृतदेह बुटीबोरीजवळील जंगलात पुरले होते. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. नितीन हिवसे व अॅड. मीना हिवसे यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)
रंजनकुमार शर्मांवर काय कारवाई करता येईल?
By admin | Published: March 30, 2017 2:40 AM