परिहार यांच्या मृत्यूमुळे प्रश्न उपस्थित : व्यस्त जीवन जगणाऱ्यांमध्ये भीतीनागपूर : काही वर्षांपूर्वी हृदयविकार म्हटले की उतरत्या वयाची व्यक्ती डोळ्यांपुढे येत होती. परंतु, सध्या चित्र बदलले आहे. तंदुरुस्त राहण्याच्या वयात अनेक व्यक्ती हृदयविकाराचे बळी ठरत आहेत. दोन दिवसांपूर्वी शहरातील आकाश परिहार या तरुण वकिलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांचे वय अवघे ३४ वर्षे होते. एवढ्या कमी वयात हृदयविकार जडण्याची काय कारणे असू शकतात, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. हृदयविकार जडण्याचे वय घटलेय काय, असे वाटायला लागले आहे. व्यस्त जीवन जगणाऱ्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.अॅड. आकाश परिहार विश्वकर्मानगर येथील रहिवासी होते. ते प्रामुख्याने उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करायचे. त्यांना मिमिक्रीचा छंद होता. यामुळे ते सर्वांना परिचित होते. वकिलांचे जीवन धावपळीचे असते. यामुळे त्यांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी फार कमी वेळ मिळतो. परिहार यांचे असेच झाले. वकिली व्यवसायातील व्यस्ततेमुळे त्यांनी हृदयाच्या वेदनेकडे दुर्लक्ष केले. परिणामी २५ जून रोजी आलेला हृदयविकाराचा जोरदार धक्का त्यांचे प्राण हिरावून गेला. आकाश परिहार हे एक ताजे उदाहरण असून, आतापर्यंत हृदयविकाराने अनेकांचे तरुण वयातच बळी घेतले आहेत. यामुळे हा आजार केवळ उतरत्या वयात होतो, असे समजण्याची परिस्थिती आज राहिलेली नाही. तेव्हा सर्वांनी हृदयाची काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे. हृदयविकाराची लक्षणे व उपचारहृदयविकार असणाऱ्या रुग्णांच्या छातीत व पाठीत दुखायला लागते. हे दुखणे सुरू असताना घाम येतो. हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी प्रत्यकाने ईसीजी, इको किंवा टीएमटीची चाचणी करणे आवश्यक आहे. चाचणी पॉझिटिव्ह आल्यास अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी किंवा पेसमेकर हे उपचार करण्यात येतात. या उपचार पद्धती आजाराच्या स्वरूपानुसार उपयोगात आणल्या जातात.(प्रतिनिधी)
हृदयविकार जडण्याचे वय घटलेय काय?
By admin | Published: June 29, 2016 2:48 AM