नागपूर : इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाची कंत्राटदार कंपनी कीस्टोन इन्फ्रा बिल्ड यांनी अजनी वनातील झाडांच्या संरक्षणाकरिता काय केले? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी उपस्थित केला व या कंपनीला यावर येत्या १३ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
अजनी वनाच्या संरक्षणासाठी स्वच्छ असोसिएशनने जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. रेल लॅण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटी व कीस्टोन यांनी अजनी वनातील शकडो झाडे अवैधरित्या कापली, असा आरोप आहे. अजनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ५४ एकर जमिनीवर विकासकामे केली जाणार आहेत. त्यासाठी कीस्टोनची नियुक्ती करण्यात आली आहे.
इमामवाडा पोलिसांनी नोंदविला एफआयआरअवैधपणे झाडे तोडण्यात आल्यामुळे मनपाने इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी १० मे रोजी संबंधित आरोपींविरुद्ध वृक्ष संवर्धन कायद्यातील कलम २१ अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. याशिवाय, मनपा उद्यान अधीक्षकांनी २५ एप्रिल रोजी रेल ऑथोरिटी व कीस्टोन या दोघांनाही नोटीस बजावली होती. त्यांनी नोटीसला उत्तर सादर करून आरोपांचे खंडन केले.