हेरीटेज रामटेक गडमंदिराच्या संवर्धनासाठी काय केले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 12:32 AM2021-06-19T00:32:00+5:302021-06-19T00:32:37+5:30
Ramtek Gad mandir रामटेक येथील हेरीटेज गडमंदिराच्या विकास व संवर्धनासाठी आतापर्यंत काय केले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकारला केली आणि यावर येत्या १४ जुलैपर्यंत सविस्तर माहिती सादर करण्यास सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक येथील हेरीटेज गडमंदिराच्या विकास व संवर्धनासाठी आतापर्यंत काय केले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकारला केली आणि यावर येत्या १४ जुलैपर्यंत सविस्तर माहिती सादर करण्यास सांगितले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. गडमंदिराच्या संवर्धनाची गरज लक्षात घेता न्यायालयाने २०१० मध्ये स्वत:च ही याचिका दाखल करून घेतली आहे. गडमंदिरात रोज शेकडो भाविक दर्शनाकरिता जातात. परंतु, मंदिरात आजही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. योग्य देखभाल केली जात नसल्यामुळे येथील पुरातन बांधकामांचे नुकसान होत आहे. मंदिर परिसरात अनेकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. मंदिर परिसरातील दुकानदारांकडून मंदिराला काहीच आर्थिक उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे दुकानदारांना अटी व नियमांसह नियमित करणे गरजेचे आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी वराह, शिरपूर, भैरव व गोकुल ही चार प्रवेशद्वारे ओलांडावी लागतात. या प्रवेशद्वारांची अवस्था चांगली नाही. गडाच्या पायथ्याशी रुद्र नरसिम्हा व केवल नरसिम्हा यांची १५०० वर्षे जुनी मंदिरे आहेत. त्यांना ऐतिहासिक महत्व आहे. परंतु, दोन्ही मंदिराच्या देखभालीकडे लक्ष दिले जात नाही अशा तक्रारी आहेत. या प्रकरणात वरिष्ठ वकील ॲड. आनंद जयस्वाल न्यायालय मित्र आहेत. रामटेक नगर परिषदेतर्फे अॅड. महेश धात्रक यांनी कामकाज पाहिले.