लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिक घरीच राहण्याऐवजी छोट्या-छोट्या माहितीसाठी बँकेत येत आहेत. यात वयस्क नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बँकेच्या प्रवेशद्वारावरच त्यांना ठोस बँकिंग कारण विचारल्यावरच आत पाठविले जात आहे. पैसे विड्रॉलचे व्यवहार एटीएमने होत असताना सामान्य नागरिकांनी पैसे भरणे किंवा पैसे काढणे आणि बँकिंग व्यवहाराची माहिती घेण्यासाठी बँकेत येऊ नये, असे आवाहन बँकांनी केले आहे. बँकांच्या विविध शाखांमध्ये दररोज होणारी ग्राहकांची गर्दी हा अधिका-यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
सदर प्रतिनिधीने नंदनवन येथील बँक ऑफ बडोदा आणि सक्करदरा येथील बँक ऑफ इंडिया बँकेची पाहणी केली असता बँकेबाहेर ग्राहकांची मोठी रांग दिसून आली. ग्राहकांना विचारण केली असता एका वयस्क नागरिकाने पासबुक अपडेट करण्यासाठी, तर दुस-याने एफडीआरचे रिन्युअल करण्यासाठी आल्याचे सांगितले. एक ग्राहक बँकेत नवीन अकाउंट उघडण्यासाठी आल्याचे सांगितले. बँकेच्या अधिका-यांनुसार ही तिन्ही कामे १५ मेनंतर करता येऊ शकतात. ग्राहक अगदी छोट्या कामासाठी बँकेत येत आहेत. त्यामुळे बँकेच्या आत आणि बाहेर गर्दी दिसून येते. त्यामुळे बँकेत आल्याशिवाय काम होणार नाही, अशाच कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. बँकेच्या गेटवर ग्राहकांना कामाचे स्वरूप विचारून परत पाठविण्यात येत आहे.
अनेक जण कमी रक्कम बँकेत भरण्यासाठी येतात. ही रक्कम घरीही ठेवता येते. कोरोनाकाळात अशा कामांसाठी ग्राहकांनी बँकेत येऊ नये, असे बँकेच्या अधिका-यांनी सांगितले. बँका अत्यावश्यक सेवेत येत असल्याने बँकांची शाखा कार्यालये ग्राहकांसाठी खुली राहणार आहे. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकांत होणारी अनावश्यक गर्दी टाळावी, तसेच ग्राहकांनी इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, पैसे भरण्याचे मशीन आणि एटीएमचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन अधिका-यांनी केले आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि बँकेकडे असलेल्या डिजिटल बँकिंग सुविधांमुळे ग्राहक बहुतांश व्यवहार बँकेत न येताही करू शकतात. रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार रोखीने व्यवहार टाळा आणि डिजिटल बँकिंगचा जास्तीतजास्त उपयोग करा, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.
बँक शाखा कार्यालयांतील गर्दी रोखणे हे बँक कर्मचारी आणि ग्राहकांसाठी एक आवाहन आहे. काम असलेल्या व्यक्तीनेच बँकेत यावे. कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये ठरावीक सुरक्षित अंतर ठेवावे. सर्वच बँकांच्या शाखांच्या गेटवर सुरक्षा गार्ड तैनात आहे. त्यांच्यातर्फे प्रत्येक ग्राहकाचे तापमान मोजून आणि हातावर सॅनिटायझर देऊन आत सोडण्यात येत आहे. आपत्तीच्या काळात कोण ग्राहक कोरोना रुग्ण आहे, हे कळणे कठीण आहे. त्याचा फटका बँक कर्मचा-यांना बसण्याची जास्त शक्यता आहे. नागपुरात अनेक शाखांमध्ये कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यानंतर ग्राहक बँकांमध्ये गर्दी करताहेत, हे समजण्यापलीकडे असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
आवश्यक कामाशिवाय बँकेत येऊच नये
अनेक बँकिंग कामे ही नंतरही करता येऊ शकतात. त्यानंतरही ग्राहक एफडीआर रिन्युअल, पासबुक एन्ट्री, नवीन चेकबुक, एफडीआरवर लागणारा टीडीएसचा फॉर्म भरणे आणि लहान कामांसाठी बँकेत येतात. ग्राहकांच्या सुरक्षेची व्यवस्था बँकेने केली आहे. कोरोनाकाळात ग्राहकांनी संयम बाळगावा.
किरण देशकर, व्यवस्थापक, शिक्षक सहकारी बँक
डिजिटल बँकिंगचा उपयोग करावा
कोरोनाकाळात ग्राहकांनी डिजिटल बँकिंग आणि मोबाइल अॅपचा उपयोग करावा. या माध्यमातून अनेक बँकिंग कामे होऊ शकतात. त्यानंतरही ग्राहक शाखांमध्ये गर्दी करतात. हे चुकीचे आहे. ग्राहकांनी कर्मचा-यांसह स्वत:ची सुरक्षा करावी. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मास्क व सॅनिटायझरचा उपयोग करावा.
मकरंद फडणीस, वरिष्ठ व्यवस्थापक, युनियन बँक
बँक ऑफ बडोदामध्ये पासबुकची एन्ट्री करण्यासाठी आलो आहे. अर्धा तासापासून रांगेत उभा आहे. पैशांचा ताळमेळ साधावा लागतो.
सदाशिव दाते, ग्राहक़
दुचाकी वाहनाच्या कर्जाचा हप्ता चुकला असून तो भरण्यासाठी बँकेत आलो आहे. ४० मिनिटांपासून रांगेत आहे. जास्त व्याज लागू नये, हा हेतू आहे.
मोहन दलाल, ग्राहक
व्यावसायिक असून काही जणांना चेक दिले आहेत. खात्यात तेवढे पैसे नसल्याने भरण्यासाठी आलो आहे. चेक बाउन्स होऊ नये, याकरिता धडपड आहे.
माधव सोनपत, ग्राहक