नागपूर : कुठल्याही आजारांच्या उपचारात आधुनिक तंत्रज्ञानाचा खूप मोठा वाटा असतो. म्हणूनच राज्य व केंद्र शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) कोट्यवधी रुपयांचे आधुनिक उपकरण खरेदी करून दिले आहेत; परंतु हे यंत्र हाताळणारे तंत्रज्ञच नसल्यामुळे व त्याच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने त्या धूळ खात पडल्या आहेत. परिणामी गोरगरीब रुग्णांना पदरमोड करून ऐनवेळी खासगी केंद्रामध्ये धाव घ्यावी लागत आहे. मेडिकलमध्ये ईईजी, ईएमजी, एनसीव्ही, सीपीटीएस या सारखे अनेक यंत्र बंद पडले असून महागड्या यंत्रसामग्रीचे करायचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मेडिकलमध्ये विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड येथून रुग्ण येतात. रुग्णांच्या आजाराचे तत्काळ निदान व्हावे, चांगले उपचार मिळावे म्हणून शासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उपकरणे उपलब्ध करून देते. विशेष म्हणजे, रुग्णालय प्रशासन व शासनही यंत्र खरेदीसाठी बरीच उत्सुकता दाखविते; परंतु ते हाताळण्यासाठी तंत्रज्ञच देत नाही. धक्कादायक म्हणजे, संबंधित विभागांच्या डॉक्टरांना त्याचे प्रशिक्षण दिले जात नाही. केवळ यंत्र लादले असल्याचे एका वरिष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. ‘एमआरआय’ सारखे महत्त्वाचे यंत्र दीड वर्षांपासून बंद आहे.
- सायकॅट्रिक विभागातील ईईजी बंद
मेंदूमधील विद्युत लहरींचा हालचाली समजण्यासाठी ईईजी (इलेक्ट्रा एन्सेफॅलोग्रॅम) महत्त्वाचे असते. मेंदूच्या वेगवेगळ्या भागात दुखापत झाली किंवा रक्तस्राव झाला, तर या लहरींचे रूप बदलते. यावरून कुठल्या भागाला इजा झाली आहे याचे निदान करायला मदत होते. विशेषत: एपिलेप्सीचे निदान करण्यासाठी ईईजी हमखास वापरतात. असे असतानाही तंत्रज्ञाअभावी हे यंत्र सहा ते सात वर्षांपासून बंद आहे. सूत्रानुसार, या लाखो रुपयाच्या मशीनवर सुरुवातीच्या काळात १०-१२ रुग्णांची तपासणी झाली. नंतर ते बंद पडले ते कायमचे. याच यंत्रामध्ये आता प्रगत तंत्रज्ञान आल्याने हे जुने यंत्र उपयोगी नसल्याची माहिती आहे.
-ईएमजी, एनसीव्ही मशीन कुलपात
औषध वैद्यकशास्त्र विभागांतर्गत ईएमजी (इलेक्ट्रोमायोग्राफ) व एनसीव्ही (नर्व्ह कंडक्शन व्हेलॉसिटी) या दोन्ही मशीन कुलपात बंद आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून याचा वापरच झाला नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. एनसीव्ही तपासणीत रुग्णाची ‘नर्व्ह डॅमेज’ आहे का किंवा त्यात काही गडबड असल्याची तपासणी होते. तर मसल्स डॅमेज झाल्यावर ईएमजी तपासणी करते. विशेष म्हणजे, या दोन्ही तपासणी करण्यासाठी साधारण दोन तास लागतात. तंत्रज्ञ नसल्याने व रुग्णांच्या गर्दीमुळे डॉक्टर नाइलाजाने या दोन्ही तपासण्यासाठी रुग्णांना बाहेर पाठवित असल्याची माहिती आहे.
-सीपीटीएसही बंद
हृदय आणि फुप्फुस यांच्या क्षमतेचे निदान करणारी ‘कार्डिओप्लमनरी टेस्ट सिस्टीम’(सीपीटीएस) हे लाखो रुपये किमतीची मशीनही बंद आहे. ज्यांना चालताना दम लागतो, त्या रुग्णांची या मशीनवर चाचणी केली जाते. यात हृदयाचा आजार आहे की फुप्फुसांचा याचे निदान होते. परंतु देखभालीअभावी ही मशीन बंद पडल्याचे समजते.
-बंद यंत्र सुरू होणार
मेडिकलमध्ये जी यंत्रे बंद आहेत त्याची माहिती घेतली जात आहे. जी सुरू करण्यासारखी आहे ती लवकरच सुरू होतील. तंत्रज्ञाच्या जागा भरण्याचे प्रस्तावित आहे. परंतु ते उपलब्ध होईपर्यंत डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाईल. नवीन ‘एमआरआय’ खरेदीचा पुन्हा एक प्रस्ताव हाफकिन कंपनीकडे पाठविला आहे. लवकरच हे यंत्र उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
-डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता मेडिकल